bank of maharashtra

मराठमोळी अभिनेत्री प्रिया मराठेची कर्करोगाशी झुंज अपयशी

0

मुंबई : छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन झाले आहे. ती अवघ्या ३८ वर्षांची होती. मुंबईनजीक मीरारोड परिसरातील निवासस्थानी तिचे निधन झाले. तिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते. मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला. कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली. ऐन गणेशोत्सवात अचानक तिच्या निधनाची बातमी समोर आल्याने मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ अशा अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. गोड चेहऱ्याच्या या अभिनेत्रीने ‘तू तिथे मी’, ‘तुझेच मी गीत गात आहे’सारख्या मालिकांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारली होती. तिची ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेतील मोनिका तुफान गाजली, पण ही मालिकाही तिने अर्ध्यात सोडली होती. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही ती घराघरात पोहोचली.

गेल्या वर्षीपासून सोशल मीडियावरही विशेष सक्रिय नव्हती. तिने शेवटची पोस्ट ११ ऑगस्ट २०२४ रोजी केली होती. ज्यात तिने शंतनूसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत. प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे ती श्रीकांत मोघे यांची सूनही होती.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech