नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात ‘गणेशोत्सव’ साजरा केला जात आहे. येणाऱ्या काळात अनेक सण साजरे होतील. या सणांमध्ये तुम्ही स्वदेशी कधीही विसरू नये. सोबतच या सर्व सणांच्या आनंदात स्वच्छतेवर भर देत राहा, कारण जिथे स्वच्छता असते तिथे उत्सवांचा आनंदही वाढतो, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
‘मन की बात’च्या १२५ वा भाग कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे’, अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे’, अभिमानानं म्हणा ‘ही स्वदेशी आहे’. आपल्याला या भावनेनं पुढे जायचं आहे. एकच मंत्र ‘व्होकल फाॅर लोकल’, एकच मार्ग ‘आत्मनिर्भर भारत’, एकच ध्येय ‘विकसित भारत’. भेटवस्तू त्याच, ज्या भारतात तयार झाल्या असतील, कपडे तेच, जे भारतात बनले असतील, सजावट तीच, जी भारतात बनवलेल्या साहित्यापासून केलेली असेल, रोषणाई तीच, जी भारतात बनवलेल्या झिरमिळ्यांपासून बनली असेल – आणि अशा अनेक गोष्टी, जीवनाच्या प्रत्येक गरजेची प्रत्येक गोष्ट, स्वदेशी असावी.
एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना देशाच्या एकतेसाठी आणि विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे आणि निश्चितच या मध्ये खेळाची महत्वपूर्ण भूमिका आहे आणि त्यामुळेच मी म्हणतो की, जो खेळतो तोच खुलतो, आपला देश सुद्धा जितके सामने खेळेल तितकाच तो बहरेल, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.