मुंबई : मुंबईकरांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात यंदा तब्बल ३३ तासांचा विलंब झाला. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळी दहा वाजता लालबागचा राजा मंडपातून मार्गस्थ झाला होता. लाखो भाविकांच्या जयघोषात आणि पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात ही विसर्जन मिरवणूक निघाली. लालबाग, परळ, चिंचपोकळी, भायखळा, दादर अशा मार्गाने मिरवणूक पुढे सरकत अखेर रविवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचली.
गिरगाव चौपाटीवर पोहोचताच वातावरण आणखीनच उत्साही झाले. मात्र समुद्राला आलेली भरती आणि अत्याधुनिक तराफ्यावरील तांत्रिक अडचणींमुळे विसर्जनाच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला. यंदा लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातहून विशेष स्वयंचलित तराफा आणण्यात आला होता. मूर्ती त्या तराफ्यावर चढवण्याचा पहिला प्रयत्न सकाळी करण्यात आला, परंतु भरतीमुळे तराफा खूप हलू लागल्याने मूर्ती चढवता आली नाही. त्यानंतर मूर्तीवरील दागिने काढून दुसरा प्रयत्न करण्यात आला. पण ज्या ट्रॉलीवर मूर्ती होती, ती वाळूत अडकली आणि विसर्जन पुन्हा थांबले. दरम्यान लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर थांबलेला असताना इतर गणपती मंडळांच्या मूर्तींना विसर्जनासाठी पुढे पाठवण्यात आले.
मंडळाला भरतीचा अंदाज नाही : नाखवा हिरालाल वाडकर
वर्षानुवर्षे लालबागच्या विसर्जनाच्या सहभागी होणाऱ्या कोळी बांधवांनी यावर भाष्य करताना म्हटले की, काही कारणांमुळे ओहोटी-भरतीचा अंदाज लालबागचा राजा मंडळाला आला नाही. आम्ही वाडकर बंधू बरीच वर्षे लालबागचा राजाचे विसर्जन करत आलो आहोत. मात्र काही कारणांमुळे राजाचे विसर्जन आता वाडकर बंधूंकडे नाही. गुजरातचा तराफा आल्यामुळे लालबागचा राजा मंडळाने हे कंत्राट त्यांना दिले आहे. पण यापुढे मंडळाने विसर्जनाची काळजी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी दिली.
समुद्राच्या भरती-ओहोटीच्या चक्रामुळे लालबागच्या राजाला थांबवावे लागले. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, “अरबी समुद्रातील भरती-ओहोटीचा अचूक अंदाज न आल्याने उशीर झाला. आम्ही पहिला प्रयत्न केला पण तो भक्तांच्या श्रद्धेच्या दृष्टीने थांबवला.आता ओहोटीची वाट पाहत आहोत. विसर्जनाला जो उशीर झाला त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो आणि मुंबई पोलिस आणि मुंबई महापालिका प्रशासनाचे मी आभार मानतो. भरतीच्या दरम्यान विसर्जन पार पाडले जाईल.”
गिरगाव चौपाटीवर लाखो भाविक जमले होते. यादरम्यान तराफ्यावर विराजमान होण्याआधी भाविकांची धाकधूक वाढली होती. ‘मुंबईचा राजा’चे कार्यकर्तेही मदतीसाठी धावले. समुद्रकिनाऱ्यावर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणा सतत घुमत होत्या. अखेर सायंकाळी ४.३० च्या दरम्यान भरती कमी झाल्यानंतर राजाची मूर्ती असणारी ट्रॉली पुढे सरकली आणि ती तराफ्यावर ठेवण्यात मंडळाला यश आले.तेव्हा भक्तांच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले होते. रात्री सडे आठ नंतर भरती योग्य पातळीवर आल्यावर लालबागच्या राजाचा तराफ्या वर आरती करण्यात आली. तोच जोष उत्साहात आरती करून राजा विसर्जना साठी प्रस्तान केले गेले. कोळी बांधवांच्या सहकार्याने आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांनंतर बाप्पाला खोल समुद्रात नेण्यात आले आणि शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले.
या विसर्जन सोहळ्यात उद्योगपती अनंत अंबानीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. पोलिस, महापालिका, एनडीआरएफ, तसेच स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवले. तब्बल ३५ तासांच्या प्रतीक्षेनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन पार पडल्यावर संपूर्ण चौपाटीवर भावनिक वातावरण निर्माण झाले. भक्तांच्या अश्रूंनी आणि जयघोषांनी समुद्रकिनारा दुमदुमून गेला.
२०२५ च्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या विसर्जनाने इतिहासात एक वेगळं पान जोडले. तांत्रिक अडचणी, समुद्राची भरती-ओहोटी आणि प्रचंड गर्दी या सर्वांवर मात करत अखेर बाप्पाला निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” ”ही शाल कोणाची? लालबागच्या राजाची” या घोषणांनी गिरगाव चौपाटी दुमदुमली आणि बाप्पाच्या भावूक निरोपाने या वर्षीचा उत्सव संपन्न झाला.