bank of maharashtra

सूर्यकांत मांढरे यांच्या जुन्या मराठी सिनेमांचे होणार मोफत प्रदर्शन – ॲड. आशिष शेलार

0

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असून, ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांचे जुने मराठी सिनेमे प्रेक्षकांना मोफत पाहण्याची संधी मिळणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केली. कोल्हापूर येथे सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजित ज्येष्ठ अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम ‘चित्रसूर्य’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमल महाडिक, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, विभीषण चवरे, सूर्यकांत मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच नागरिक व श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ‘चित्रसूर्य’ कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने सहसंचालक चवरे यांच्याकडून यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. यावेळी मंत्री म्हणाले, कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात अशाच पद्धतीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सूर्यकांत मांढरे यांचे जुने चित्रपट प्रखर राष्ट्रवाद, देव देश धर्म, समाज बांधणी, समाजातील विघटन वाद संपणे यांना प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मांढरे यांच्या कुटुंबातील सदस्यांचा सत्कार व सन्मान यावेळी करण्यात आला.

‘चित्रसूर्य’ कार्यक्रमातून अभिनेते सूर्यकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा
सूर्यकांत मांढरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चित्रसूर्य’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शाहू स्मारक, कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या संगीत कार्यक्रमातील संहिता लेखन आणि संशोधन डॉ. सुवर्णा चवरे यांनी केले होते, संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले. निवेदन सीमा देशमुख आणि श्रीरंग देशमुख यांनी केले. निवेदकांनी खूपच अलगदपणे सर्व श्रोत्यांना सूर्यकांत मांढरे यांच्या प्रत्येक सिनेमात नेऊन ठेवले.

कार्यक्रमात सूर्यकांत मांढरे यांनी मराठी सिनेमात दिलेल्या योगदानाबाबत माहिती देण्यात आली. तसेच विविध मराठी गाणी देखील सादर करण्यात आली. सूर्यकांत मांढरे यांच्या आठवणींना उजाळा देत निवेदकांनी श्रोत्यांपुढे तो काळ जिवंत केला. सूर्यकांत यांनी अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांची जयश्री गडकर यांच्यासोबतची जोडी विशेष लोकप्रिय होती. त्यांचे शंभरांहून जास्त चित्रपट प्रदर्शित झाले होते. यातील निवडक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका, त्यांचे संवाद, आठवणी तसेच गमतीशीर अनुभव निवेदकांनी मांडले.

प्रामुख्याने चित्रीकरणादरम्यानचे प्रसंग सांगताना ‘सांगते ऐका’, ‘भाऊबीज’, ‘मल्हारी मार्तंड’, ‘शिवाजी महाराज’, ‘मीठ भाकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘जय भवानी’, ‘वारणेचा वाघ’, ‘साधी माणसं’, ‘जय भवानी’, ‘थोरातांची कमळा’, ‘धन्य ते संताजी धनाजी’, ‘केतकीच्या बनात’ इत्यादी चित्रपटांची नव्या रसिक श्रोत्यांना माहिती झाली.

सूर्यकांत यांच्यावर चित्रीत झालेली गाणी यात ‘आमचा गणपती’, ‘ये जवळी घे जवळी’, ‘रम्य अशा स्थानी’, ‘कोकीळ कुहू कुहू बोले’, ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘राजाच्या म्हाहाली’, ‘पडला पदर खांदा’, ‘कधी शिवराय यायचे तरी’, ‘शंकरा करुणाकरा’, ‘बघत राहूदे तुझ्याकडे’, ‘आला वसंत ऋतू आला’ ही गाणी सादर करण्यात आली. गायक मयूर सुकाळे, अभिषेक तेलंग, मधुरा कुंभार, शेफाली कुलकर्णी, पियुषा कुलकर्णी आणि कार्तिकी गायकवाड यांनी मधुर गायनातून गाणी गायली.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech