मुंबई : सध्या महाराष्ट्रात मराठी-हिंदी भाषा मुद्दा फारच चर्चेत आहे.आधी सरकारचा पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय, नंतर तो जीआर मागे घेणं, मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिकांना काही दिवसांपूर्वी मनसे कार्यकर्त्यांनी मारणं असे अनेक प्रकार राज्यात घडले.अनेक सेलिब्रिटींही या वादावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता नुकतंच अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही यावर मत व्यक्त करत म्हणाल्या कि, “मी हिंसेच्या विरोधात आहे. एखाद्या अशा ठिकाणी जायचं जिथे काही लोक मराठी बोलत नाहीत आणि त्यातल्या दोन-तीन लोकांना कानाखाली मारायच्या, यातून काहीही साध्य होणार नाही.”
एका मुलाखतीत रेणुका शहाणे म्हणाल्या, “जर तुम्ही एखाद्या ठिकाणी बऱ्याच वर्षांपासून राहत असाल तर तिथली स्थानिक भाषा, संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. ही चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्नाचं म्हणजे तुम्ही याचा आदर केला पाहिजे. त्या भाषेत बोलणं महत्वाचं नाही, तर तुम्हाला ती भाषा शिकावीशी वाटणे हा तुमचा उद्देश महत्वाचा आहे. आदर करा. ज्या लोकांना स्थानिक भाषा आणि संस्कृती शिकून घेण्याची गरज वाटत नाही असे लोक मला पटत नाहीत. “आणखी एक म्हणजे मी हिंसेच्या विरोधात आहे. एखाद्या अशा ठिकाणी जायचं जिथे काही लोक मराठी बोलत नाहीत आणि त्यातल्या दोन-तीन लोकांना कानाखाली मारायच्या, यातून काहीही साध्य होणार नाही.”
रेणुका शहाणे यांनी हिंदी भाषिक अभिनेते आशुतोष राणा यांच्याशी लग्न केलं आहे. दोन दिवसांपूर्वी आशुतोष राणा यांनीही या वादावर प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणालेले की, “माझ्या मुलांची मातृभाषा मराठी आहे आणि माझ्या बायकोचीही, तर तुम्ही काळजी करु नका. भाषा कधीच विवादाचा विषय नसते तर ती कायम संवादाचा विषय असते. भारत इतका पारिवारिक आणि अद्भूत देश आहे जिथे सर्व भाषा बोलल्या जातात. भारत देशाचा संवादावर विश्वास आहे.”