bank of maharashtra

खादी इंडिया व एसबीआयचा स्वदेशी रुपे गिफ्ट कार्डचा केला शुभारंभ

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “हर घर स्वदेशी, घर घर स्वदेशी” आणि “गर्व से कहो ये स्वदेशी है” या घोषणा पूर्ण करण्यासाठी, भारत सरकारच्या सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने शुक्रवारी दिल्लीतील प्रीतमपुरा येथे “खादी दिवाळी महोत्सव” चे आयोजन केले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “डिजिटल इंडिया” मोहिमेला समर्थन देत, खादी इंडियाने देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) सहकार्याने देशातील पहिले स्वदेशी “खादी इंडिया-एसबीआय रुपे प्रीपेड गिफ्ट कार्ड”चा शुभारंभ केला. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष मनोज कुमार यांनी, भेट देण्यासाठी तयार केलेल्या या गिफ्ट कार्डचे प्रकाशन केले. हे कार्ड खादी उत्पादने खरेदी करण्यासाठी पारंपारिक कागदी कूपनऐवजी डिजिटल पध्दतीने रक्कम देण्याचा एक नवीन पर्याय प्रदान करेल.

२० ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या खादी दिवाळी खरेदी महोत्सवात महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, ओडिशा, तामिळनाडू आणि ईशान्येकडील राज्यांसह देशभरातील खादी संस्था आणि ग्रामोद्योग केंद्रांचे जवळपास ५० स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्समध्ये खादी वस्त्रे, वनौषधी उत्पादने, हस्तकलेच्या वस्तू, ​​हस्तनिर्मित कागद, मध, अगरबत्ती, मातीची भांडी, चामड्याची उत्पादने अशा अनेक वस्तू प्रदर्शित केल्या आहे. उत्सवाच्या काळात स्वदेशी उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देणे, ग्रामीण कारागिरांचे उत्पन्न वाढवणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “व्होकल फॉर लोकल” आणि “हर घर स्वदेशी” मोहिमांना गती देणे, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

ग्राहकांचा अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी, या प्रदर्शनात भारताच्या पारंपारिक कला आणि हस्तकलेची थेट प्रात्यक्षिके देखील सादर केली जातील. हे केवळ एक प्रदर्शन नसून ग्रामीण कलाकार आणि कारागिरांना त्यांची कला प्रदर्शित करण्यासाठी, त्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताच्या स्वदेशी कारागिरीचे जतन करण्यासाठी हातभार लावणारे एक उत्तम व्यासपीठ आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech