bank of maharashtra

हिजाब घालून शाळेत प्रवेश नाकारला, प्रकरण उच्च न्यायालयात

0

एर्नाकुलम : केरळच्या एर्नाकुलम येथे एका शाळेत हिजाब घालून आलेल्या मुस्लिम विद्यार्थिनीला वर्गात प्रवेश नाकारल्याने वाद निर्माण झाला आहे. शाळा प्रशासनाने हे शालेय गणवेशाच्या नियमांचे उल्लंघन असल्याचे सांगितले, तर विद्यार्थिनीच्या पालकांनी आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (एसडीपीआय) या घटनेचा तीव्र विरोध केला आहे. प्रकरण चिघळल्यानंतर शाळेने २ दिवसांची सुट्टी जाहीर केली असून हे प्रकरण आता केरळ उच्च न्यायालयात पोहोचले आहे. शाळांमध्ये हिजाबवर बंदी घालण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. एर्नाकुलम येथील चर्च संचालित सेंट रीटा पब्लिक स्कूल मध्ये एका मुस्लिम विद्यार्थिनीला हिजाब घालून शाळेत प्रवेश नाकारण्यात आला. शाळेने तिला हिजाब काढण्यास सांगितले, ज्यामुळे वाद निर्माण झाला.

विद्यार्थिनी म्हणाली की, “मला हिजाब घालून वर्गात जाऊ दिले नाही. त्यांनी मला वर्गाच्या दरवाज्याशी उभे ठेवले आणि हिजाब काढायला सांगितले. शिक्षक खूप कठोर आहेत. मी इथे शिकणार नाही.”या प्रकरणावरून विद्यार्थिनीचे पालक आणि शाळा प्रशासन यांच्यात वाद झाला. पालक-शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जोशी कैथावलप्पिल यांनी सांगितले की, हिजाब शाळेच्या गणवेश नियमाविरोधात आहे. त्यांनी या वादामागे एसडीपीआयचा हात असल्याचा आरोप केला आहे, जी एक इस्लामिक विचारसरणीची राजकीय संघटना आहे.

जोशी यांच्या मते, एसडीपीआयचे कार्यकर्ते शाळांमध्ये अशा गोष्टी लागू करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि व्यवस्थेवर दबाव टाकत आहेत.शाळेने सर्व पालकांना पत्र लिहून स्पष्ट केले की सर्व विद्यार्थ्यांना ड्रेस कोडचे पालन करणे आवश्यक आहे. प्रकरण इतके गंभीर झाले की शाळेने १३ आणि १४ ऑक्टोबर रोजी दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली. तसेच शाळा प्रशासनाने केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech