bank of maharashtra

‘बिग बॉस’ फेम कशिश कपूरच्या घरात चोरी; नोकर ४.५ लाख रुपये घेऊन फरार

0

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री कशिश कपूरच्या अंधेरीतील घरातून तब्बल ४.५ लाख रुपयांची चोरी झाली असून, तिचा नोकर सचिन कुमार हा पैशांसह फरार झाला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कशिश कपूर ही मूळची बिहारची असून, सध्या अंधेरीतील वीरा देसाई रोडवरील न्यू अंबिवली सोसायटीमध्ये राहतात. तिने आपल्या घरी गेल्या पाच महिन्यांपासून काम करणाऱ्या नोकर सचिन कुमारविरोधात चोरीची तक्रार दाखल केली आहे. सचिन दररोज सकाळी ११:३० वाजता येऊन दुपारी १ वाजता काम संपवून घरी जात असे. मात्र, यावेळी तो घरातून ४.५ लाख रुपये घेऊन अचानक गायब झाला आणि अद्याप त्याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.

कशिशने सांगितले की, तिने आपल्या आईला पैसे पाठवण्यासाठी एकूण ७ लाख रुपये घरी ठेवले होते. ९ जुलै रोजी जेव्हा तिने कपाट उघडले, तेव्हा तिला फक्त २.५ लाख रुपयेच मिळाले. उरलेले पैसे सगळीकडे शोधूनही सापडले नाहीत. त्यानंतर तिने सचिनकडे विचारणा केली, तेव्हा तो घाबरून घरातून पळून गेला. यामुळे कशिशचा संशय अधिकच बळावला आणि तिने अंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. कशिश कपूर हिने ‘बिग बॉस’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता. तसेच ती काही हिंदी मालिकांमध्येही झळकली आहे. सध्या पोलिस आरोपी सचिन कुमारचा शोध घेत आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech