साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
“माझ्या नादाला लागू नका, मी काम करणारा माणूस आहे” एकनाथ शिंदेचा विरोधकांना इशारा
“आपापसातील मतभेद गाडून टाकत एकदिलाने कामाला लागण्याचे आदेश”
दिवाळीनंतर कधीही आचारसंहिता लागण्याचे दिले संकेत
सातारा : “नको नको ते तुम्ही खाल्ले, त्यामुळे तुमचे कंबरडे मोडले. आता हंबरडा मोर्चा काढून काही उपयोग नाही. कंबरडे मोडल्यावर हंबरडा फोडण्यात काही अर्थ नाही,” अशा शब्दांत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद गाडून एकदिलाने कामाला लागा. ‘शिवसेना माझी’ या भावनेने कार्य करा,” असे आवाहन त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
सातारा येथील स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिंदे बोलत होते. या वेळी मंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, सुहास बाबर, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, संपर्कप्रमुख शरद कणसे, जयवंत शेलार, अंकुश बाबा कदम, सिद्धाराम मेहेत्रे, राजेंद्र यादव, शारदा जाधव, यशराज देसाई आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उप मुख्यमंत्री म्हणाले, “मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या साताऱ्याच्या भूमीला मी वंदन करतो. दिवाळीनंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे आजचा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे. बूथप्रमुख आणि गटप्रमुखांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाची लवकरच आखणी करा. हेच कार्यकर्ते शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून निवडणुकीचा विजय निश्चित करतात.” शिंदे यांनी जिल्ह्यातील शाखा विस्ताराचे कौतुक करताना सांगितले, “विलास शिंदे यांनी १०५ शाखा सुरू केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ ही संकल्पना आपण जोपासली पाहिजे. संकटात मदत करणारा शिवसैनिक हेच आपले ब्रीद आहे.”
ते पुढे म्हणाले, “२०१९ मध्ये शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांविरुद्ध भूमिका घेतली. जनतेने शिवसेना-भाजप युतीला बहुमत दिले होते. पण २०२२ मध्ये मी जनतेच्या मनातील काम केले. ५० आमदार माझ्यासोबत आले, आम्ही मंत्रिपदे सोडली पण जनतेचा विश्वास मिळवला. मुख्यमंत्री झाल्यानंतर पूल, रस्ते, धरणे अशा अनेक विकास प्रकल्पांना गती दिली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. विरोधकांनी टीका केली, पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांना धडा शिकवला आणि २३२ उमेदवारांना निवडून दिले.”
“लेक लाडकी लखपती, एसटीमध्ये मुलींना ५० टक्के सवलत, शेतकरी सन्मान योजना, वयोश्री योजना अशा कल्याणकारी योजना राबवल्या. एका बाजूला विकास आणि दुसरीकडे जनकल्याण हा समतोल राखण्यात आम्ही यशस्वी ठरलो,” असे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीवर टीका करताना ते म्हणाले, “त्यांचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री ठरले होते, फाईव्ह स्टार हॉटेल बुक झाले होते; पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचे बुकिंग रद्द केले. आज माझी दुसरी इनिंग सुरू आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथे बदल घडवले. त्यामुळेच लोकांचा विश्वास वाढला आणि शिवसेनेमध्ये ‘इन्कमिंग’ वाढले.”
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटी रुपयांचे कोटींचे पॅकेज, रक्तदान उपक्रमांचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, “शिवसेना म्हणजे सेवा आणि समाजकारण. पूरात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले, सैनिकांच्या कुटुंबांचा सन्मान केला. नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला योग्य धडा शिकवला; विरोधक मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात हेच त्यांचे पाकिस्तान प्रेम आहे काय असा घणाघात केला.
“बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे आमचे सूत्र आहे. ‘कामाचं तोरण हे शिवसेनेचं धोरण’ हेच आम्ही प्रत्यक्ष कृतीतून दाखवले आहे,” असे ते म्हणाले. शिंदे पुढे म्हणाले, साताऱ्याचे पाणी काय असते हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. माझ्या ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं. एक घाव, दोन तुकडे आणि विषय एंड, निर्णय ऑन द स्पॉट, हेच आमचं कामाचं तत्त्व आहे.”
उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका करत शिंदे म्हणाले, “एका चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला जनतेने उचलून फेकले हे लक्षात ठेवा, त्यामुळे एकनाथ शिंदेच्या नादाला लागू नका. मी काम करणारा माणूस आहे. आरोपांना कामातून उत्तर दिलं आणि जनतेने पुन्हा निवडून दिलं.” आगामी योजनांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले, “महाबळेश्वर फेस्टिव्हलला प्रतिसाद मिळाला. आता कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल होणार आहे. त्यामुळे स्थानिक रोजगारनिर्मिती होईल. मुंबई-पुण्याला नोकरीसाठी जाणारा युवक पुन्हा आपल्या गावातच थांबेल. कोयना नदीवर तीन पूल बांधत आहोत. जनतेला व पर्यटनाला त्याचा लाभ होईल.”
शेवटी त्यांनी कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला सांगितले. “शिवसेना मजबूत करण्याची, हिंदुत्वाची शान राखण्याची, महाराष्ट्राच्या प्रगतीची आणि विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याची!” तसेच शिंदे म्हणाले, “निवडणुकांसाठी यादी अत्यंत महत्त्वाची आहे. मतदार यादी नीट वाचा, बदललेल्या किंवा डबल नावांची तपासणी करा. मृत व्यक्तींची नावे काढून टाका. जिल्हा परिषदांच्या मतदार याद्या जाहीर झाल्या आहेत. त्यात आपली माणसे आहेत का हे तपासा.”
विशेष निवडणूक ॲप लाँच केल्याचे सांगून शिंदे म्हणाले, “प्रत्येक शाखाप्रमुख, गटप्रमुख, आमदार, खासदारांनी प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या कामात मध्ये लक्ष घालावे. डोळ्यात तेल घालून काम करा. लोकसभा-विधानसभेत ८० पैकी ६०जागा जिंकल्या — हे तुमच्या परिश्रमाचे फळ आहे.” महाविकास आघाडीवर शेवटचा घाव घालत ते म्हणाले, “ही महाविकास आघाडी नाही, महा कन्फ्युज आघाडी आहे. कोण काय बोलतो हे त्यांनाच माहीत नाही. फक्त गोंधळ आणि दिखावा आहे.”
“तिकीट एकालाच मिळणार आहे, पण सत्ता आपल्याकडे आहे. तिकीट न मिळालेल्यांना मंडळे, महामंडळे, कमिट्या यांत स्थान देण्यात येईल. विरोधकांनी मनातलं विष काढून टाकावं. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला म्हणजे द्वेष का?” असा सवाल करत शिंदे म्हणाले, “घटनाबाह्य सरकार म्हणून आम्हाला हिणवलं, पण जनतेने मला मुख्यमंत्री बनवलं आणि त्यांना फेकून दिलं. आजही माझा अजेंडा खुर्ची नव्हे, तर जनतेचे प्रश्न सोडवणे हा आहे.”