मुंबई : विधानभवन परिसरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये गुरुवारी मारामारी झाली होती. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री २ वाजेपर्यंत विधानभवन परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. विधानभवनाच्या मागच्या प्रवेशद्वाराने आव्हाड यांचा समर्थक नितीन देशमुख याला पोलीस घेऊन जात असतांना आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांनी पोलिसांचे वाहन अडवले. पोलिसांच्या वाहनांच्या समोरच आंदोलन करत आव्हाड थेट वाहनाच्या खाली झोपले. त्यामुळे मध्यरात्री विधानभवन परिसरात गोंधळाचे वातावरण होते. जितेंद्र आव्हाड यांच्यासमवेत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार नंतर उपस्थित झाले होते.
पोलिसांच्या वतीने मार खाणार्याला अटक केली जात असून त्याला मारहाण करणाऱ्या ५ जणांची पाठराखण केली जात असल्याचा आरोप या वेळी जितेंद्र आव्हाड यांनी केला. या सर्व गोंधळाचे चित्रीकरण कॅमेर्यात कैद झाले असून या प्रकरणाचे आता राजकीय पडसाद उमटत आहेत. जनतेने विकास कामे करण्यासाठी आमदारांना निवडून दिलेले असते. असे असतांना विधान भवनाच्या परिसरामध्ये दोन नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली तुंबळ मारामारी आणि शिवीगाळ यामुळे राज्याच्या राजकारणाचा दर्जा आता किती ढासळला ? याविषयी चर्चा चालू झाल्या आहेत.
विधानभवन परिसरात झालेल्या मारामारीनंतर पोलिसांनी बळाचा वापर करत धरपकड चालू केली; मात्र आव्हाड यांनी थेट पोलिसांच्या गाडी समोर ठिय्या आंदोलन करत गाडी रोखून धरली. पोलिसांना आव्हाड यांना फरफटत बाहेर काढावे लागले. त्यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा बोलावून सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.