मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात ही नोंद झाली असून, गुरुवारी रात्री विधानभवन परिसरात पोलिसांचं वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची परवानगी घेऊन ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून आमदार आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात वाद सुरू होता. काही दिवसांपूर्वी विधानभवनात प्रवेश करत असताना आव्हाड यांनी नाव न घेता “मंगळसूत्र चोराचा” अशी घोषणा देत पडळकरांना डिवचले होते. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. याच व्हिडिओवरून विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आव्हाड-पडळकर यांच्यात वाद झाला होता. पडळकर आपल्या वाहनातून उतरत असताना तिथे आव्हाड उभे होते. त्यामुळे पडळकरांनी गाडीचा दरवाजा जोरात ढकलला. त्यावर मुद्दाम हा दरवाजा जोरात ढकलला आणि तो मला लागल्याचा आरोप आव्हाड यांनी केला. यावरून या दोघांमध्ये आधी शाब्दिक चकमक झाली. हे प्रकरण आणखी तापले आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यापर्यंत प्रकरण गेले.
गुरुवारी सायंकाळी विधानभवनाच्या लॉबीत आव्हाड यांचे कार्यकर्ते नितिन देशमुख आणि पडळकर यांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. या कार्यकर्त्यांचा आवाज चढत गेला. शरद पवार यांच्या बद्दल आमदार पडळकर बोलले तर बघून घेऊ, असे आव्हाड यांचा कार्यकर्ता बोलत होता. तर त्यावर पडळकर यांचा कार्यकर्ता टकले आव्हाडाविरोधात बोलला. आम्ही कोणाला घाबरत नाही. असे तो ओरडून सांगत होता. यावेळी तेथे गर्दी जमली. त्यात हे दोघे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. यात आव्हाड यांच्या कार्यकर्त्याचा शर्ट फाडला गेला. या दोघांना दोन्ही बाजूने त्यांचे कार्यकर्ते मागे खेचत होते. तेव्हा विधानभवनाचे सुरक्षारक्षक धावून आले आणि त्यांनी या दोघांना पकडले. याप्रकरणात गोपीचंद पडळकर यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी विधानभवनात आमदारही सुरक्षित नसल्याचा आरोप केला होता.
या प्रकारानंतर पोलिसांनी उशिरा रात्री नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले यांना ताब्यात घेतले. यावरून आमदार जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले. त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर ठिय्या मांडत निषेध नोंदवला. “मारहाण करणाऱ्यांना न सोडता पीडितांनाच तुरुंगात डांबले जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. या आंदोलनानंतर अखेर पोलीसांनी आव्हाड यांना बाजूला हटवले. पोलिसांनी शुक्रवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.