श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा झाला आहे. यादरम्यान एक सैनिकही जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. या दरम्यान, जेव्हा दहशतवाद्यांना समजले की त्यांची घेराबंदी झाली आहे, तेव्हा त्यांनी गोळीबार सुरू केला. माहितीनुसार दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. मात्र, तिथे किती दहशतवादी उपस्थित आहेत याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
कुलगाममधील चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले आहे. याच दरम्यान लष्कराचा एक जेसीओ (ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर) जखमी झाला आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक अद्यापही सुरू आहे. २ ते ३ दहशतवादी अडकले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही चकमक सकाळी ८ वाजता सुरू झाली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी गुडार वनक्षेत्रात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहीम राबवली. त्यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केल्यानंतर शोधमोहीम एका चकमकीत रूपांतरित झाली.
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आज, सोमवारी पाच राज्ये आणि जम्मू-काश्मीरमधील एकूण २२ ठिकाणी छापे टाकले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही कारवाई एका दहशतवादी कटाशी संबंधित प्रकरणाच्या तपासाच्या संदर्भात करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला, कुलगाम, अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.