हैदराबाद : हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आयपीएल २०२५ दरम्यान झालेल्या तिकीट घोटाळ्याच्या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरु केला आहे. सीआयडीने बुधवारी रात्री हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन मोहन राव यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना अटक केले आहे. आयपीएल तिकीट घोटाळ्याबद्दल त्यांची चौकशी करण्यात आली आहे. एचसीएचे खजिनदार सी श्रीनिवास राव, मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कांते, सरचिटणीस राजेंद्र यादव आणि त्यांची पत्नी कविता यांचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली. आयपीएल दरम्यान सनरायझर्स हैदराबादने हैदराबाद क्रिकेट असोसिएशनवर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. सनरायझर्सने म्हटले आहे की, एचसीएने त्यांना मोफत तिकिटांसाठी ब्लॅकमेल केले.
सनरायझर्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ईमेल लिहून तक्रार केली होती. सनरायझर्स हैदराबादच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पत्रात लिहिले होते की, सनरायझर्स हैदराबाद संघाबाबत एचसीएकडून सतत होणाऱ्या ब्लॅकमेलिंगबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. हे वारंवार घडत आहे आणि मला वाटते की, आता बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्वरित कारवाई करावी. आम्हाला फ्रँचायझीकडून एचसीएला देण्यात येणाऱ्या मोफत तिकिटांबद्दल स्पष्टता हवी आहे. एचसीएचे अध्यक्ष जगन मोहन राव, कोषाध्यक्ष आणि सचिव हे सनरायझर्स हैदराबाद व्यवस्थापनाला सतत धमकी देत आहेत आणि म्हणत आहेत की, जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर ते हैदराबादमध्ये आयपीएल सामने होऊ देणार नाहीत.