नवी दिल्ली : श्रीलंकेच्या नौदलाने, कोलंबो येथे दिनांक २७ ते २९ नोव्हेंबर या दरम्यान आयोजित केलेल्या, आंतरराष्ट्रीय जहाज प्रदर्शनात (फ्लीट रिव्ह्यू,आयएफआर-२०२५) भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत, तसेच स्वदेशी बनावटीची युध्दनौका आयएनएस उदयगिरी या भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करत आहेत. हा कार्यक्रम श्रीलंका नौदलाच्या ७५ व्या वर्धापन दिन सोहळ्याचा एक भाग असून त्यात अनेक देशांतील नौदल जहाजे, शिष्टमंडळे आणि निरीक्षक सहभागी होणार आहेत.
हा दोन्ही जहाजांचा पहिलाच परदेशातील तैनातीतील सहभाग असून प्रादेशिक सागरी सहकार्य मजबूत करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करत आहे. स्वदेशी बनावटीच्या आणि राष्ट्राचा अभिमान असलेल्या आयएनएस विक्रांतचा हा पहिलाच सहभाग हिंद महासागर प्रदेशात (आयओआर) आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यूमध्ये सहभागी होणाऱ्या नौदलांसोबत भारत घेत असलेल्या सततच्या सहभागावर प्रकाश टाकतो आणि सहकार्य आणि आंतरकार्यक्षमतेद्वारे शांतता, स्थिरता आणि सुरक्षितता वाढविण्यावरील भारताच्या भूमिकेचे प्रतिबिंब दर्शवितो.
नुकत्याच कार्यान्वित झालेल्या आयएनएस उदयगिरीच्या यातील सहभागामुळे भारताची प्रगत स्वदेशी जहाजबांधणीची क्षमता आणि आयओआरमध्ये तिची संतुलितपणे विकसीत होणारी नौदल उपस्थिती अधोरेखित होते. कोलंबोमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, जहाजांचे औपचारिक प्रदर्शन (फ्लीट रिव्ह्यू), शहरातून ओळख(सिटी परेड) नागरिकांसाठी आयोजित प्रसार उपक्रम (कम्युनिटी आउटरीच अॅक्टिव्हिटीज) आणि व्यावसायिक नौदल संवाद यासारख्या महत्त्वाच्या ‘आयएफआर’ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील. सार्वजनिकरित्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, आयएफआर – २०२५ दरम्यान ही जहाजे अभ्यागतांसाठी यावेळी देखील खुली असतील.
