तब्बल ६० हजार कोटी रुपयांच्या सोने-चांदीची खरेदी
नवी दिल्ली : देशभरातील बाजारपेठांमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्ताने प्रचंड खरेदी-विक्री झाली. अंदाजानुसार, यावर्षी संपूर्ण देशात सुमारे १ लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला. यामध्ये ६० हजार कोटी रुपयांचा सोने-चांदीचा व्यवहार झाला असून, दिल्ली शहरात १० हजार कोटी रुपयांहून अधिकची विक्री झाली. सोने आणि चांदीच्या वाढत्या किमती असूनही, ग्राहकांनी परंपरेप्रमाणे दागिने, नाणे आणि विविध वस्तूंची खरेदी केली. मागच्या वर्षी सोने ८० हजार रुपये प्रति १० ग्रॅम होते, तर यंदा ते १ लाख ३० हजार प्रति १० ग्रॅमवर गेले. चांदीची किंमतही ९८ हजार रुपये प्रति किलोवरून थेट १ लाख ८० हजार प्रति किलोवर पोहोचली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) राष्ट्रीय सरचिटणीस आणि दिल्लीचे खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला समुद्रमंथनात धन्वंतरि अमृतकलश घेऊन प्रकट झाले, म्हणूनच हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो.यावर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी देशात एकूण व्यापाराचा आकडा १ लाख कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. सोने-चांदीचे दागिने, नाणे आणि इतर वस्तू यामध्ये ६० हजार कोटी रुपयांचा व्यापार झाला, तर दिल्लीमध्ये १० हजार कोटी रुपयांची विक्री झाली. जी मागील वर्षाच्या तुलनेत २५ टक्क्यांहून अधिक आहे.
धनत्रयोदशीला तांबे, चांदी किंवा स्टीलची नवी भांडी, स्वयंपाकघरातील उपकरणे, झाडू आणि पूजेची सामग्री खरेदी करणे शुभ मानले जाते. झाडू खरेदी केल्याने दरिद्रता दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचे आगमन होते असे मानले जाते. आधुनिक काळात मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही शुभ खरेदी केली जात असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले. त्यासोबतच भांडी व स्वयंपाकघरातील वस्तूंची १५ हजार कोटी रुपयांची खरेदी झाली. तर इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल वस्तूंमध्ये १० हजार कोटींची उलाढाल झाली. तसेच सजावट, दिवे व पूजेच्या सामग्रीवर ३ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली. तसेच ड्राय फ्रूट्स, फळे, मिठाई, कपडे आणि वाहनांवर १२ हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
कॅट आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अॅन्ड गोल्डस्मिथ फेडरेशनचे (एआयजेजीएफ) राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा यांनी सांगितले की, मागील दोन दिवसांत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आणि त्यामुळे सोने-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ झाली. जीएसटीच्या दरात झालेल्या कपातीमुळे यंदा व्यापारात मोठी वाढ झाली आहे. तसेच स्वदेशी वस्तू खरेदीचा आग्रह लक्षात घेऊन ग्राहक स्थानिक आणि देशी उत्पादने प्राधान्याने खरेदी करत आहेत, त्यामुळे लहान व्यापारी आणि स्थानिक उत्पादकांना फायदा झाला.