bank of maharashtra

भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” केले विकसित

0

नवी दिल्ली : केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी माहिती दिली की, भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” विकसित केले आहे, जे प्रतिरोधक श्वसन संसर्गाविरुद्ध प्रभावी आहे. विशेषतः कर्करोग आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी ते उपयुक्त आहे. ते म्हणाले की हे प्रतिजैविक भारतातील पूर्णपणे परिकल्पित, विकसित आणि वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित पहिला अणु आहे, जे औषधनिर्माण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे. भारत सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाने सुप्रसिद्ध खाजगी औषधनिर्माण कंपनी वोक्हार्टच्या सहकार्याने नेफिथ्रोमायसिन हे प्रतिजैविक विकसित केले आहे.

“मल्टी-ओमिक्स डेटा इंटिग्रेशन आणि ऍनालिसिससाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर” या विषयावरील ३ दिवसांच्या वैद्यकीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारताने आपल्या वैज्ञानिक आणि संशोधन विकासाला चालना देण्यासाठी एक स्वयं-शाश्वत परिसंस्था विकसित केली पाहिजे. विज्ञान आणि नवोन्मेषात जागतिक मान्यता मिळविलेल्या बहुतांश राष्ट्रांनी खाजगी क्षेत्राच्या व्यापक सहभागासह स्वयं-शाश्वत, नवोन्मेष-चालित मॉडेल्सद्वारे हे करून दाखवले आहे.

आरोग्यसेवा परिणाम सुधारण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि जीनोमिक्स यांच्या एकत्रीकरणाद्वारे आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनांचा पाया रचल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी सर गंगाराम रुग्णालय सारख्या संस्थांचे कौतुक केले. विकसित भारत @२०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी सरकारी विभाग, खाजगी रुग्णालये आणि संशोधन संस्थांमध्ये सहकार्य वाढवण्याचे आवाहन केले.

डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारत जैवतंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जीनोमिक औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्णतेच्या एका नवीन युगात प्रवेश करत आहे. नवोन्मेष, सहकार्य आणि करुणेचा संगम, विकसित राष्ट्राच्या दिशेने भारताच्या प्रवासाला दिशा देईल आणि जागतिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले नेतृत्व प्रस्थापित करेल असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवकुमार कल्याणरमन, डॉ. एन.के. गांगुली, डॉ. डी.एस. राणा आणि डॉ. अजय स्वरूप उपस्थित होते.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech