नवी दिल्ली : भारताने अफगाणिस्तानसोबत पूर्ण राजनैतिक संबंध पुन्हा बहाल केले असून काबूलमध्ये दूतावास सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. तालिबानच्या सत्तेखाली असलेल्या अफगाणिस्तानसोबत संबंध पुन्हा सुरू करताना भारताने काबूलमधील आपल्या मिशनला “पूर्ण दूतावासाचा दर्जा” देण्याचे जाहीर केले आहे. तालिबान शासनासंदर्भात भारत सरकारचा हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
अमीर खान मुत्ताकी हे तालिबानच्या शासनाखाली नवी दिल्लीला आलेले पहिले अफगाण परराष्ट्र मंत्री आहेत. त्यांच्याशी संवादादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी काबूलमध्ये दूतावास पुन्हा उघडण्याची घोषणा केली.शुक्रवार (दि.१०) सकाळी एस. जयशंकर यांनी त्यांचे अफगाण समकक्ष अमीर खान मुत्ताकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, “भारताने नेहमीच अफगाणिस्तानला साथ दिली आहे. अफगाणिस्तान आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अलीकडेच अफगाणने दहशतवादाविरोधात लढ्यात आमची साथ दिली आणि पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.”
चार वर्षांपूर्वी, तालिबान आणि तत्कालीन अफगाण सरकार यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताने काबूलमधील दूतावासाचा दर्जा कमी केला होता, तसेच इतर छोट्या शहरांतील वाणिज्य दूतावास बंद करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी मुत्ताकींना सांगितले की,“आता भारताने अफगाणिस्तानसोबत पूर्ण राजनयिक संबंध पुन्हा सुरू केले आहेत आणि काबूलमधील ‘तांत्रिक मिशन’ला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला जाईल.”
याशिवाय, जेव्हा अफगाणिस्तानमध्ये हिंसाचार उफाळला होता, तेव्हा भारत सरकारने दूतावासातील कर्मचाऱ्यांना परत आणण्यासाठी लष्करी विमानांची तैनाती केली होती. १५ ऑगस्टच्या अखेरीस आणि १६ ऑगस्टच्या सुरुवातीला दोन C-17 वाहतूक विमानांनी उड्डाण केलं. तथापि, त्या हिंसाचाराच्या सुमारे एक महिन्यानंतर भारताने काबूलमध्ये पुन्हा राजनयिक उपस्थिती सुरू केली होती.
त्या काळात तालिबान अधिकाऱ्यांनी असे आश्वासन दिले होते की, भारताने जर काबूलमध्ये आपले अधिकारी पुन्हा पाठवले, तर त्यांना योग्य सुरक्षा दिली जाईल. आता, अफगाणिस्तान आणि भारत यांच्यातील संबंधात स्पष्ट सुधारणा झाली आहे आणि राजनयिक पातळीवर पुन्हा विश्वास निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.