नवी दिल्ली : शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) शिखर संमेलनाच्या आधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती जिनपिंग यांनी यावर भर दिला की भारत आणि चीन हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसून, विकास भागीदार आहेत. तसेच, त्यांनी हेही स्पष्ट केले कि, मतभेदांना वादात रूपांतरित करू नये.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, भारत-चीनमधील चांगले संबंध हे दोन्ही देशांच्या आर्थिक विकासासाठी आणि संपूर्ण जगासाठी आवश्यक आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक वाढवण्याचे उपाय आणि व्यापारातील तुटीवर राजकीय व धोरणात्मक पातळीवर काम करण्याबाबत चर्चा केली. ट्रंपच्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये असलेल्या संबंधांवरही या बैठकीत चर्चा झाली.
परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत निवेदनात सांगण्यात आले की, पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना २०२६ मध्ये भारतात होणाऱ्या ब्रिक्स शिखर संमेलनासाठी आमंत्रित केले. दोन्ही देशांनी मान्य केले की ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाहीत आणि आपसातील मतभेदांना वादात बदलू देणार नाहीत.विदेश मंत्रालयाच्या निवेदनानुसार, पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत आणि चीन हे दोघेही धोरणात्मक स्वायत्तता जपण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांचे संबंध कोणत्याही तिसऱ्या देशाच्या दृष्टीकोनातून पाहू नयेत.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, “भारत आणि चीनच्या २.८ अब्ज लोकांमध्ये परस्पर सन्मान आणि हितांच्या आधारे स्थिर संबंध असणे आवश्यक आहे.” पंतप्रधान मोदींनी सीमावर्ती भागांमध्ये शांतता आणि स्थिरतेचे महत्त्व अधोरेखित केले आणि द्विपक्षीय संबंधांच्या सातत्यपूर्ण विकासासाठी हे आवश्यक असल्याचे नमूद केले.दोन्ही नेत्यांनी गेल्या वर्षी झालेल्या सैन्य माघारीनंतर सीमावर्ती भागात टिकून असलेल्या शांततेवर समाधान व्यक्त केले.
परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत आणि चीनच्या मजबूत अर्थव्यवस्थांमुळे आणि व्यापार संबंधांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला स्थैर्य देता येऊ शकते. ट्रंपच्या टॅरिफ घोषणांच्या पार्श्वभूमीवर हा संदेश अमेरिकेसाठी एक ठाम इशारा मानला जात आहे. अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताने नवीन व्यापार भागीदार शोधण्यास सुरुवात केली आहे.