रुअनंतपुरम : पत्नीला नोकरी सोडण्यास भाग पाडणे आणि तिच्यावर संशय घेणे हे मानसिक क्रौर्य मानले जाईल असा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयाने दिला.तसेच न्यायालयाने पिडीत महिलेला घटस्फोटाची परवानगी दिली. न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एम. बी. स्नेहलता यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात म्हटले आहे की, पतीचे असे वर्तन हे घटस्फोट अधिनियम, 1869 च्या कलम 10(1)(x) नुसार गंभीर मानसिक क्रौर्याच्या स्वरूपाचे आहे, ज्याच्या आधारावर पती-पत्नींपैकी कोणालाही घटस्फोट मंजूर होऊ शकतो. त्याचप्रमाणे न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, जोडीदारावर संशय घेणे आणि त्याच्यावर सतत लक्ष ठेवणे हे वैवाहिक नात्याच्या पाया असलेल्या विश्वास, आदर आणि भावनिक सुरक्षिततेला हादरा देते. तसेच न्यायालयाने सांगितले की, संशयी पती वैवाहिक आयुष्याला नरक बनवू शकतो. सततचा अविश्वास आणि संशय विवाहातील प्रेम, विश्वास आणि समजुतीला विषारी बनवतो. जो पती आपल्या पत्नीच्या निष्ठेवर वारंवार शंका घेतो, तो तिचा आत्मसन्मान आणि मानसिक शांतता नष्ट करतो. विवाहाचे मूळ आधार म्हणजे परस्पर विश्वास. जेव्हा त्या जागी संशय येतो, तेव्हा नात्याचा अर्थच संपतो असे कोर्टाने नमूद केले.
न्यायालयाने स्पष्ट केले की, पती जर विनाकारण पत्नीवर संशय घेत असेल, तिच्या हालचालींवर लक्ष ठेवत असेल, तिच्या प्रामाणिकतेवर प्रश्न उपस्थित करत असेल आणि तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यात हस्तक्षेप करत असेल, तर त्यामुळे पत्नीला मानसिक त्रास सहन करावा लागतो. या प्रकरणात संबंधित महिलेने सुरुवातीला कुटुंब न्यायालयात क्रौर्याच्या आधारावर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, पुराव्यांच्या अभावामुळे तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर तिने उच्च न्यायालयात अपील दाखल केले. महिलेचं लग्न २०१३ साली झालं होतं. तिचं म्हणणे होते की, लग्नाच्या सुरुवातीपासूनच पती तिच्यावर संशय घेत असे आणि तिच्या आयुष्यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असे. त्यामुळे ती सतत मानसिक आणि शारीरिक छळाची बळी ठरत होती. पतीने तिला परिचारिकेची नोकरी सोडून परदेशात त्याच्यासोबत राहण्यास भाग पाडले. पण त्यानंतरही पतीने तिच्यावर विविध बंधने घातली, तिला घरात बंद ठेवत असे आणि कोणाशीही फोनवर बोलू देत नसल्याचे याचिकार्त्या महिलेने न्यायालयाला सांगितले.
