मुंबई : केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा ‘बॉम्बे’ विरुद्ध ‘मुंबई’ असा जुना वाद चांगलाच उफाळून आला आहे. “आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई केले नाही यासाठी देवाचे आभार” असं वक्तव्य त्यांनी कार्यक्रमादरम्यान करताच राज्यातील राजकारण तापलं. राष्ट्रीय क्वांटम मोहिमेअंतर्गत फॅब्रिकेशन अँड सेंट्रल फॅसिलिटीचे उद्घाटन करण्यासाठी ते आयआयटी मुंबईत आले होते. भाषणात त्यांनी आयआयटी मद्रासप्रमाणे ‘बॉम्बे’ हे नाव तसंच राखल्याचा उल्लेख केला आणि त्यानंतर वादाची ठिणगी पडली.
या वक्तव्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत एक्सवर सरकारवर हल्लाबोल केला. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचे विधान हे केंद्र सरकारच्या ‘मानसिकतेचे प्रतीक’ असल्याचे ते म्हणाले. मुंबई ही मराठी माणसाची असून तिला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा डाव पूर्वीही हाणून पाडला गेला आणि त्याचाच ‘मळमळलेला’ परिणाम आज दिसत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. जम्मूमधून आलेल्या नेत्याचा मुंबईशी संबंध नसताना, शीर्ष नेतृत्वाला खूष करण्यासाठी असे वक्तव्य केले जाते, अशी टीकाही त्यांनी केली.
राज ठाकरे यापुढे म्हणाले की ‘मुंबई’ हे नाव मुंबादेवीवरून आले असून, ही मराठी ओळख काहींना खटकते. त्यामुळे ‘मुंबई’ऐवजी ‘बॉम्बे’ हे नाव टिकवण्यामागे शहरावर ताबा मिळवण्याचा राजकीय डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी मांडला. चंदिगढप्रमाणेच मुंबई आणि पुढे संपूर्ण एमएमआर प्रदेश गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. केंद्रीय हस्तक आणि उद्योगपती आधीच काय ताब्यात घेत आहेत, हे आपण पाहत आहोत, म्हणून तरी मराठी माणसांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, मनसे कार्यकर्त्यांनी रात्रीच आयआयटीच्या मुख्य गेटवर ‘आयआयटी बॉम्बे नाही, आयआयटी मुंबई’ असे बॅनर लावून आपला विरोध नोंदवला. या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेत्यांनीही राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. आयआयटी बॉम्बे हे संसदेच्या कायद्याने स्थापन झाले असून त्याचे नाव बदलण्यासाठी कायदेशीर सुधारणा करावी लागेल, त्यामुळे तत्काळ बदल शक्य नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे. मात्र, केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने मुंबई–बॉम्बे वाद पुन्हा पेटला असून महाराष्ट्रातील राजकारण महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत.
