bank of maharashtra

नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण

0

गडचिरोली : महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद्यांच्या हिंसेवर मोठा यशस्वी टप्पा गाठला गेला आहे. नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटी आणि पोलिट ब्युरो सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ सोनू उर्फ भूपती यांनी आज आपल्या ६० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर ऐतिहासिक आत्मसमर्पण केले.हा आत्मसमर्पण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला, ज्यामुळे या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या सोहळ्याला राज्याचे पोलीस महासंचालक आणि इतर अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी आपले शस्त्रे पोलिसांना सुपूर्द केली.

गेल्या काही दिवसांपासून भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांसह मध्यस्थांच्या माध्यमातून शरणागतीसंबंधी चर्चा सुरू होत्या. भूपतीने शरणागती पत्करण्याआधी स्पष्ट केले होते की ही प्रक्रिया फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडावी. मुख्यमंत्र्यांनी त्यांची ही अट मान्य करत स्वतः उपस्थित राहून हा कार्यक्रम यशस्वी केला. आत्मसमर्पण करताना भूपतीने स्पष्ट केले की, सशस्त्र नक्षलवाद्यांचा मार्ग सोडून सरकारसोबत शांततेच्या मार्गाने समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची त्यांची भूमिका आहे.

या शरणागतीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संविधानाची प्रत सुपूर्द केली, जे त्यांना लोकशाही आणि कायद्याच्या चौकटीत आणण्याचे एक प्रतीकात्मक आणि कायदेशीर पाऊल ठरले. गेल्या जवळपास ४० वर्षांपासून सातत्याने नक्षलवादाशी लढणारा गडचिरोली जिल्हा, सुरुवातीच्या काळात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हा भाग देखील नक्षलवादाने ग्रस्त होता. त्यामध्ये विशेषतः गडचिरोली जिल्हा हा सीमावर्ती भाग आहे. हा सर्व भाग मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला. त्यावेळी कोंडापल्ली सीतारामय्याने पीपल्स वार ग्रुप तयार केला, त्यानंतर तेव्हाचा आंध्र प्रदेश आणि गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात माओवादी सक्रिय झाले आणि येथील युवकांमध्ये व्यवस्थेच्या विरोधात संभ्रम निर्माण करण्यात आला”, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

भारतीय संविधानाने आपल्याला न्याय मिळवू शकत नाही, असा संभ्रम तेव्हा येथील युवकांमध्ये निर्माण केला गेला, तसेच जंगलातून आपण राज्य चालवून एक नवी व्यवस्था उभी करू अशा प्रकारचे स्वप्न त्यावेळी तरुणांना दाखवले गेले. त्यावेळी अनेक तरुण या स्वप्नाला बळी पडले, त्यांना वाटले की त्या व्यवस्थेतून समता येईल. मात्र, खरी समता फक्त संविधानाने येऊ शकते. त्या काळात अनेक तरुण माओवादी चळवळीकडे ओढले. मात्र, त्यानंतर त्यांचा सर्व स्वप्नांचा खरा चेहरा समोर आला. आज सोनू उर्फ भूपतीचं आत्मसमर्पण आपण घेतलं आहे.

गेल्या १० वर्षांपर्यंत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक योजना आखण्यात आली. त्यामध्ये एकीकडे प्रशासन आणि विकास समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे, तसेच दुसरीकडे जे लोक शस्त्र घेऊन हिंसाचार करतात त्यांच्यासमोर दोनच विकल्प ठेवायचे. एकतर त्यांनी शस्त्र सोडून मुख्य व्यवस्थेत सहभागी व्हायचं. अन्यथा पोलीस कारवाईला सामोरं जायचं. अशा प्रकारची योजना आखण्यात आली. त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या देशातून माओवाद हद्दपार करण्यासाठी चांगलं काम केलं आहे”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

या महत्त्वपूर्ण शरणागतीमुळे राज्यात सशस्त्र नक्षलवाद लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता वाढली आहे. सन १९८० पासून गडचिरोलीत सुरू झालेल्या नक्षलवाद्यांच्या सशस्त्र चळवळीमध्ये आतापर्यंत ५३८ सामान्य नागरिकांचा जीव गेला आहे. भूपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी शस्त्रे खाली ठेवून समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतल्याने राज्यात नक्षलवाद्यांच्या हिंसेवर नियंत्रण मिळवण्याची आणि नक्षलमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने एक ठोस टप्पा गाठल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech