नवी दिल्ली : आणीबाणीच्या काळात शिस्त आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली क्रूरता करण्यात आली. आणीबाणी हा केवळ भारताच्या इतिहासातील एक काळा अध्याय मानला जाऊ नये, तर त्याचे धडे पूर्णपणे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी म्हटले आहे. थरूर यांनी १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणलेल्या आणीबाणीवर मल्याळम भाषेतील एका वृत्तपत्रात लेख लिहिला आहे. यात त्यांनी इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्या या काळातील कामांवर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहे. थरुर यांनी पुढे म्हटले की, आणीबाणीमध्ये कशाप्रकारे स्वातंत्र्य हिरावून घेतले जाते, तेव्हा जग कसे ‘मानवी हक्कांच्या उल्लंघना’बद्दल अनभिज्ञ राहिले हे देखील सांगितले आहे. शिस्त आणि सुव्यवस्थेसाठी केलेले प्रयत्न क्रूरतेत रूपांतरित झाले जे समर्थनीय ठरू शकत नाही.
इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांनी सक्तीची नसबंदी मोहीम सुरू केली. हे आणीबाणीचे सर्वात चुकीचे उदाहरण आहे. पन्नास वर्षांपूर्वी इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीतून हे दिसून आले की, सुरुवातीला हळूहळू, चांगल्या किंवा वाईट हेतूंच्या नावाखाली लहान लहान वाटणाऱ्या गोष्टींचे स्वातंत्र्य कसे हिरावून घेतले जाते. म्हणूनच हा एक मोठा इशारा आहे, लोकशाहीच्या समर्थकांनी नेहमीच जागरूक राहिले पाहिजे, असे थरूर म्हणाले. देशासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहेत, केवळ आणीबाणीच अंतर्गत अव्यवस्था आणि बाह्य धोक्यांना तोंड देऊ शकते, तसेच अराजक देशात शिस्त आणि कार्यक्षमता आणू शकते, असा आग्रह तेव्हा इंदिरा गांधींनी धरला होता.
जून १९७५ ते मार्च १९७७ पर्यंत जवळजवळ दोन वर्षे चाललेल्या आणीबाणीच्या काळात, नागरी स्वातंत्र्य निलंबित करण्यात आले आणि विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. शिस्त आणि सुव्यवस्थेची इच्छा अनेकदा अव्यक्त क्रूरतेत रूपांतरित होते, संजय गांधींनी राबविलेली नसबंदी हे क्रूर उदाहरणं आहे. गरीब आणि ग्रामीण भागात केंद्रित होती, तिथे मनमानी लक्ष्ये साध्य करण्यासाठी जबरदस्ती आणि हिंसाचाराचा वापर केला गेला होता, असा आरोपही थरूर यांनी केला आहे. दिल्लीसारख्या शहरी भागात झोपडपट्ट्या निर्दयीपणे पाडल्यामुळे हजारो लोक बेघर झाले आणि त्यांच्या कल्याणाची त्यांना काहीच पर्वा नव्हती. आणीबाणीने लोकशाही संस्था मजबूत दिसत असल्या तरी किती नाजूक असू शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण दिले. लोकशाहीला कमी लेखू नये. हा एक मौल्यवान वारसा आहे जो सतत जोपासला गेला पाहिजे आणि संरक्षित केला पाहिजे.
आजचा भारत १९७५ चा भारत नाही. आपण अधिक आत्मविश्वासू, अधिक विकसित आणि अनेक प्रकारे अधिक मजबूत लोकशाही आहोत. तरीही आणीबाणीचे धडे अजूनही चिंताजनकपणे प्रासंगिक आहेत, असे थरूर म्हणाले. थरूर यांनी इशारा दिला की, सत्तेचे केंद्रीकरण करण्याचा, मतभेद दाबण्याचा आणि घटनात्मक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष करण्याचा मोह अनेक रूपांत समोर येऊ शकतो. अनेकदा अशा प्रवृत्तींना राष्ट्रीय हित किंवा स्थिरतेच्या नावाखाली योग्य ठरवले जाते. या दृष्टीने आणीबाणी एक कठोर इशारा आहे. लोकशाहीच्या रक्षकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे, असंही त्यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.