कोलकाता : भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली भाषिक नागरिकांवर होत असलेल्या कथित छळाविरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज मुसळधार पावसात कोलकातामध्ये भव्य निषेध मोर्चाचे नेतृत्व केले. तृणमूल काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेली ही रॅली कॉलेज स्क्वेअर येथून सुरू होऊन डोरीना क्रॉसिंग येथे संपणार असून, तिथे मुख्यमंत्री सभेला संबोधित करणार आहेत. या रॅलीसाठी शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, ६ डीसी दर्जाचे अधिकारी आणि १५०० हून अधिक पोलीस कर्मचारी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तैनात करण्यात आले आहेत. मोर्चाच्या मंचावरून बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, “आज मी सगळं काही सांगणार नाही. पण तुम्ही २१ जुलैच्या रॅलीला या. मी प्रत्येक भारतीय नागरिकाला, सर्व भाषिकांना आमंत्रित करते. मात्र, बंगाली भाषिक नागरिकांवर होणारे अत्याचार सहन केले जाणार नाहीत.”
त्यांनी स्पष्टपणे केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करत म्हणाले की, “मला अत्यंत दु:ख वाटते की केंद्र सरकारने गुपचूप एक अधिसूचना काढली आहे, जी फक्त भाजपशासित राज्यांनाच पाठवण्यात आली आहे. त्यामध्ये असं म्हटलं आहे की, फक्त बंगाली बोलल्याचा संशय जरी आला, तरी व्यक्तीला अटक करून डिटेन्शन कॅम्पमध्ये टाकता येईल. अगदी कोणी आपल्या नातेवाइकाला भेटण्यासाठी गेला असला, तरी त्यालाही अटक होऊ शकते. हे आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.” या विधानानंतर संपूर्ण रॅलीत संतप्त घोषणा दिल्या गेल्या. तृणमूल काँग्रेसने यामधून केंद्र सरकारवर भेदभावाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगाल भेटीच्या एक दिवस आधीच हा मोर्चा काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.