कासरगोड : केरळच्या कासरगोड येथे गणेशोत्सव मिरवणुकीवरून राजकारण रंगले आहे. या मिरवणुकीत फटाके फोडल्याबद्दल स्थानिक पोलिसांनी ३०० जणांवर गुन्हा नोंदवला आहे. विशेष म्हणजे कुठलीही तक्रार दाखल झालेली नसताना हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. कासबा गावातील मल्लिकार्जुन मंदिरातून शनिवारी गणेश विसर्जनाची मिरवणूक काढण्यात आली होती. याठिकाणी गणेशोत्सवाची जुनी परंपरा असून मोठ्या संख्येने लोक यात सहभागी होतात. त्यानुसार यंदा देखील ही मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने निघाली. परंतु, मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी कुणाचीही अधिकृत तक्रार नसताना स्थानिक पोलिसांनी स्वतःहून दखल घेत मिरवणुकीत सहभागी झालेल्या ३०० नागरिकांवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भातील एफआयआरमध्ये नमूद केल्यानुसार सदर मिरवणुकीमुळे रहदारीला अडचण झाली, निष्काळजीपणे फटाके फोडण्यात आले असे नमूद करण्यात आलेय. तसेच भारतीय दंड संहिता कलम २८८ (विस्फोटक पदार्थांच्या वापरामुळे धोका निर्माण करणे किंवा गैर-जवाबदारीने वागणे ज्यामुळे जणांना इजा होऊ शकते किंवा नुकसान होऊ शकते) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. एफआयआरमध्ये ३०० जणांवर गुन्हा दाखल असून यापैकी ४ आरोपींच्या नावांची नोंद करण्यात आलेली आहे. या घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान स्थानिकांनी पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी राज्यातील सत्ताधारी डाव्या पक्षाच्या नेत्यांवर सुडाच्या राजकारणाचा आरोप केलाय.