bank of maharashtra

गडचिरोली आता महाराष्ट्राचे प्रगत ‘प्रवेशद्वार’ ठरेल – मुख्यमंत्री

0

तीन लाख कोटींची गुंतवणूक आणि एक लाख रोजगाराचे उद्दिष्ट

गडचिरोली : “गडचिरोली जिल्हा आता केवळ राज्याचा शेवटचा जिल्हा उरला नसून, तो महाराष्ट्राचे प्रगत ‘प्रवेशद्वार’ म्हणून ओळखला जाईल. जिल्ह्यातील खनिज संपत्ती आणि तरुणांचे कौशल्य यांच्या जोरावर येथे ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून, त्यातून सुमारे १ लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील,” असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केला. गडचिरोली जिल्ह्यातील अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून (PPP) स्थापन करण्यात आलेल्या विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था (UATI) चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड आशिष जयस्वाल, गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म राज्यमंत्री डाॅ. पंकज भोयर, अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्स अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बालसुब्रमण्यम प्रभाकरन यांची प्रमुख उपस्थिती यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऐतिहासिक परिवर्तन : माओवादाकडून विकासाकडे
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत गडचिरोलीचा चेहरा बदलण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न केले. एकेकाळी माओवादाने ग्रस्त आणि अतिमागास ओळख असलेला हा जिल्हा आता विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. पोलीस दलाचे शौर्य आणि शासनाच्या धोरणांमुळे हा जिल्हा लवकरच माओवादमुक्त होईल. आता इथल्या तरुणांच्या हातात शस्त्र नव्हे, तर आधुनिक शिक्षण आणि रोजगार असेल.

उद्योग आणि शिक्षणाचा संगम : युएटीआय
“उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ स्थानिक पातळीवरच तयार व्हावे, या हेतूने ‘युएटीआय’ची स्थापना झाली आहे. ही संस्था उद्योग आणि शिक्षण क्षेत्राच्या सहकार्याचे एक उत्तम मॉडेल आहे,” असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. लॉयड्स मेटल्सने यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देऊन पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. या संस्थेत केवळ शिक्षणच नाही, तर विद्यार्थ्यांची राहण्याची आणि प्रवासाची मोफत सोयही करण्यात आली आहे.

भविष्याचा वेध घेणारे अभ्यासक्रम
मुख्यमंत्री म्हणाले, “येथे मायनिंग, मेटॉलॉजीपासून ते संगणक आणि एआय पर्यंतचे आधुनिक कोर्सेस शिकवले जात आहेत. विशेषतः येथील ‘लँग्वेज लॅब’मुळे स्थानिक विद्यार्थ्यांमध्ये आलेला आत्मविश्वास वाखाणण्याजोगा आहे. केवळ चार महिन्यांच्या प्रशिक्षणाने एक मुलगी ज्या आत्मविश्वासाने इंग्रजीत बोलली, ते पाहून गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याची खात्री पटली.” या कार्यक्रमाला प्रशासकीय अधिकारी, विद्यापीठाचे सिनेट सदस्य, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तद्नंतर गडचिरोली जिल्ह्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रभावी करण्याच्या दृष्टीने गडचिरोली पोलीस विभागाला ३० स्कॉर्पिओ वाहने, २ बस व २ मोटारसायकली असा एकूण ३४ वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला. या नव्या वाहनांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. तसेच गडचिरोली पोलीस विभागाच्या वाढिव विश्रामगृहाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले तद्नंतर गडचिरोली पोलीस विभागाच्या गडचिरोली महोत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांनी भाग घेतला.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech