श्रीनगर : श्रीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका आंतरराज्यीय दहशतवादी मॉड्यूलचा भंडाफोड केला आहे. या ऑपरेशनदरम्यान दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांसह एकूण पाच जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,श्रीनगरमधून अब्दुल्ला उर्फ अबू हुरैरा याच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अब्दुल्ला गेल्या १६ वर्षांपासून फरार होता.
जम्मू-काश्मीरच्या बाहेर लष्कर-ए-तैयबाची ठिकाणे उभारण्यात तो यशस्वी झाला होता. पोलिसांनी सांगितले की, अब्दुल्लासोबतच पाकिस्तानी दहशतवादी उस्मान उर्फ खुबैब यालाही या मोठ्या कारवाईत अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईत जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत केंद्रीय यंत्रणांनीही सहभाग घेतला. तपास यंत्रणांनी जम्मू-काश्मीर, राजस्थान आणि हरियाणा यांसह १९ ठिकाणी छापे टाकले असून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे.
तपासादरम्यान लष्कर-ए-तैयबाच्या एका सखोल नेटवर्कचा पर्दाफाश झाला, जे दहशतवाद्यांना साहित्य आणि आर्थिक मदत पुरवण्यात सहभागी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या पाच जणांपैकी तीन जण श्रीनगरचे रहिवासी आहेत. तसेच मोहम्मद नकीब भट, आदिल राशिद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा यांना दहशतवाद्यांना आश्रय, अन्न आणि इतर रसद सहाय्य पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासातून समोर आले आहे की एका विदेशी दहशतवाद्याने लष्कर-ए-तैयबाच्या नेटवर्कच्या मदतीने बनावट कागदपत्रे आणि ओळखपत्रांच्या आधारे देशाबाहेर प्रवास करण्यात यश मिळवले होते. हे दहशतवादी सुमारे १६ वर्षांपूर्वी भारतात घुसखोरी करून आले होते आणि काश्मीर खोऱ्यातील विविध जिल्ह्यांत सक्रिय होते. या कालावधीत त्यांनी सुमारे ४० विदेशी दहशतवाद्यांचे नेतृत्व व समन्वय केले होते. यापैकी बहुतेक दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केले आहे.
