उरलेली जैवविविधता संकटात, प्रदूषण रोखण्यासाठी कोळी समाजाचा पुढाकार हवा
ठाणे : कधीकाळी जैवविविधतेने समृद्ध असलेली ठाणे खाडी आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आणि गत दोन वर्षात ठाणें खाडीतील मासेमारी संपुष्टात आली आहे. सन २०१६ मध्ये झालेल्या मासेमार जनगणनेत ठाणें खाडी किनाऱ्यावरील अनेक गांवातील मासेमारांची संख्या शून्य झाली आहे. सुमारें २६ किलोमीटर लांबीची ही खाडी दक्षिणेला मुंबई बंदराशी तर उत्तरेला उल्हास नदीशी जोडलेली आहे. समुद्राशी जोडलेली असल्यामुळे येथे ज्वार-ओहोटीचा प्रभाव दिसतो. खाऱ्या आणि गोड्या पाण्याच्या मिश्रणामुळे इथली परिसंस्था विशेष मानली जाते.
१९६० ते १९८० च्या दशकात खाडी मत्स्योद्योगासाठी प्रसिद्ध होती. सुमारें १२७ प्रकाराची जैवविविधता ठाणें खाडी आढळून येतं होतें. चिम्बोरी , निवट्या , खरबे , मोदकं, बोयरया ,कोनबट ,जिले (कोलंबी ), कालेटि (लालसर निवटी), जिताडे , चिमण्या(शिंगाडे ), पाले या सारखी सुमारे शंभर पेक्षा जास्त प्रकारचे मासे या खाडित मिळत होते. बोकशी, झेलनं,गलौडी, पाग ,येरी या पध्दतीने या खाडीत मासेमारी होत असे.परंतु औद्योगिकीकरण आणि नागरीकरणामुळे गेल्या काही दशकांपासून या खाडीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.
ठाणे शहर आणि परिसराचा विकास (?) होत असताना औद्योगिक सांडपाणी, घरगुती सांडपाणी आणि घनकचऱ्याचा प्रचंड विसर्ग खाडीत होण्याचे वाढले आहे. त्यातच शहरात होणारे अनिर्बंध बांधकाम व रस्त्यांच्या कामामुळे खाडीत गाळाचे प्रमाण वाढले आहे. संशोधनानुसार, १९७५ मध्ये पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन (DO) 6.79 mg/l होता, तो २००२ मध्ये फक्त 2.1 mg/l इतका घसरला होता. खाडीच्या असा स्तर जलचर जीवनासाठी धोकादायक आहे. त्याचबरोबर फॉस्फेट, नायट्रेट, तांबे व जस्त यांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले असून पाण्याची गुणवत्ता खालावली आहे.(Athalye, R.P. et al. (२००३). Studies on Thane Creek.) अश्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. न्यायालयाने दिलेले निर्देश आणि त्याची अंमलबजावणी करण्यास बाध्य असलेलं शासन आणि विसर्जनसबाबत असलेल्या पारंपरिक भावना यामुळे तेढ निर्माण होणे स्वाभाविक आहे.
प्रदूषणाच्या वाढत्या पातळीला धार्मिक सणांतील मूर्ती विसर्जनामुळे अधिक गती मिळते. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) व रासायनिक रंगांपासून बनवलेल्या गणेश मूर्ती खाडीत विसर्जित केल्या जातात. यामुळे पाण्यातील ऑक्सिजन आणखी घटतो, तर रंग व धातूंचे अवशेष जलचरांवर घातक परिणाम करतात. तज्ज्ञांच्या मते, ठाणे खाडीत मूर्ती विसर्जन करणे योग्य आहे काय याचा सारासार विचार नागरिकांनी करणे आवश्यक आहे. याबाबत खाडीतील प्रदूषण रोखण्यासाठी मासेमारी करणाऱ्या कोळी समाजाने प्राधान्याने पुढाकार घेतला पाहिजे. कारण दर्यासागर त्याचं दैवत आहे.
ठाणें खाडी वाचविण्यासाठी औद्योगिक व घरगुती सांडपाणी शुद्धीकरण, मॅंग्रोव्हचे संवर्धन व वृक्षारोपण,गाळ कमी करण्यासाठी बांधकामांवर नियंत्रण, स्थानिक मच्छीमारांना पर्यावरणपूरक मत्स्योद्योगाकडे प्रवृत्त करणे. यां सारख्या उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. ठाणे खाडी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नाही तर सांस्कृतिकदृष्ट्याही महत्त्वाची आहे. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे तिची जैवविविधता धोक्यात आली आहे. योग्य उपाययोजना आणि नागरिकांचा सहभाग असेल तर खाडीचे पुनरुज्जीवन शक्य आहे. अन्यथा ठाणे खाडीची ओळख फक्त नकाशावर राहील, प्रत्यक्षात नव्हे.
आनंद प्रभाकर कोळी,
अध्यक्ष , ठाणे जिल्हा कोळी समाज,
अखिल भारतीय कोळी समाज (नवी दिल्ली) महाराष्ट्र शाखा