मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांच्याशी संबंधित सुमारे ३५ ठिकाणी आणि ५० कंपन्यांवर छापे टाकले आहेत. येस बँक कर्ज घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशी संदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने नोंदवलेले २ एफआयआर, सेबी आणि नॅशनल हाऊसिंग बँक, बँक ऑफ बडोदा, नॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग अथॉरिटी (एनएफआरए) यासारख्या एजन्सींनी दिलेल्या माहितीच्या आधारीवर ईडीने ही कारवाई केली. ईडीच्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की २०१७ ते २०१९ दरम्यान येस बँकेने मंजूर केलेले सुमारे ३ हजार कोटी रुपयांचे कर्ज शेल कंपन्या आणि समुहातील इतर कंपन्यांकडे वळवण्यात आले होते.
येस बँकेच्या प्रमोटरसह अधिकाऱ्यांनी लाच घेतल्याचे पुरावेही मिळाले आहेत. येस बँकेने मंजुर केलेल्या कर्ज प्रक्रियेत गंभीर त्रुटीही आढळून आल्या आहेत. त्यात जुन्या तारखेच्या कर्जाचे दस्तऐवज, कमकुवत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांना आणि सामान्य संचालकांना दिलेल्या कर्जाचा यात समावेश आहे. कर्जबाबतच्या अटींचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले आहे. सुमारे ५० कंपन्या आणि २५ व्यक्ती चौकशीच्या फेऱ्यात आहेत. सेबीकडून रिलायन्स होम फायनान्स लिमिटेडशी (आरएचएफएल) संबंधित निष्कर्षदेखील सादर करण्यात आले आहेत. ज्यात कॉर्पोरेट कर्ज एका वर्षाच्या आत दुप्पट झाल्याचे दिसून आले. यातून अनियमितता आणि प्रक्रिया उल्लंघनांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आल्याचे ईडीने म्हंटले आहे.