bank of maharashtra

अधिवेशन काळात केवळ आमदार, स्वीय सहाय्यक, अधिकाऱ्यांनाच प्रवेश – राहुल नार्वेकर

0

– विधिमंडळातील सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका न घेण्याचे निर्देश- अभ्यागतांच्या वर्तणुकीची जबाबदारी संबंधित आमदारांवर

मुंबई : विधानभवन परिसरात काल, गुरुवारी सत्ताधारी-विरोधी आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अध्यक्षांच्या आदेशानुसार, विधान भवन परिसरामध्ये अधिवेशन चालू असताना केवळ आमदार, त्यांचे स्वीय सहाय्यक आणि अधिकाऱ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. इतकेच नाही तर अधिवेशन काळात विधिमंडळातील सभागृहांमध्ये मंत्र्यांना बैठका न घेता मंत्र्यांनी त्यांच्या मंत्रालयातील दालनात या बैठका घ्याव्यात. आमदारांच्या नैतिक आचरणाचे उच्च मापदंड राखण्यासाठी लोकसभेच्या धर्तीवर नीती मूल्य समिती गठीत करण्याचा विचार आहे. त्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींशी विचार विनिमय करून तसेच गटनेत्यांशी चर्चा करुन या विषयाचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

नार्वेकरांनी पुढे म्हटले की, बऱ्याचदा मंत्र्यांच्या वतीने देखील विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये बैठका आयोजित करण्यासाठी अभ्यागतांना प्रवेश देण्याची विनंती करण्यात येते. मात्र, आता त्यांना त्यांच्या बैठका या मंत्रालयातील त्यांच्या दालनात घ्याव्या लागतील. अत्यंत महत्त्वाच्या परिस्थितीत, माननीय अध्यक्ष आणि सभापती यांचा समावेश असलेल्या मंडळाची मान्यता घेतल्याशिवाय मंत्र्यांना देखील विधानमंडळात बैठक घेण्याचे आणि अभ्यागतांना प्रवेश देण्याची परवानगी देण्यात येणार नाही. अभ्यागतांच्या वर्तणुकीची जबाबदारी त्या संबंधित आमदारांवर असेल. याबाबत स्पष्टता करताना ते म्हणाले की, सर्वांचे उत्तरदायित्व हे संविधानाशी आहे.

संविधानानुसार आपले विधानमंडळ आणि इतर सर्व संस्था आहेत. विधिमंडळाचे सदस्य म्हणून शपथ घेताना आपण संविधानाबद्दल खरी श्रद्धा, निष्ठा बाळगण्याची व कर्तव्य निष्ठापूर्वक पार पाडण्याची शपथ घेतली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टिकोनातून विधिमंडळ परिसरामध्ये अधिवेशन काळात कालावधीत यापुढे केवळ सन्माननीय सदस्य, त्यांचे अधिकृत स्वीय सहाय्यक आणि शासकीय अधिकारी यांनाच केवळ प्रवेश देण्यात येईल. इतर अभ्यागतांना प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच आमदारांसोबत येणाऱ्या अभ्यागतांच्या वर्तणुकीची जबाबदारी देखील त्या आमदारांवर निश्चित करण्यात येणे आवश्यक असल्याचे मत अध्यक्षांनी व्यक्त केले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech