bank of maharashtra

साप्ताहिक वारानुसार कचरा उचलण्यामुळे अनेक ठिकाणी डंम्पिंग ग्राउंड

0

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलनाचा इशारा

कल्याण : कल्याण डोबिवली महापालिकेने शुन्य कचरा मोहिम राबवितांना आता साप्ताहिक वारानुसार कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. या तुघलकी आदेशामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डंम्पिंग ग्राउंड तयार होतील असे सांगत शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांनी हे तुघलकी आदेश त्वरीत बदलण्याची मागणी केली आहे. महापालिकेने काढलेल्या नव्या आदेशानुसार यापुढे शुन्य कचरा मोहिमेत सोमवारी प्लॅस्टिक बाटल्या व इतर, मंगळवारी कापड. बुधवारी कागद व पुठ्ठा, गुरुवारी प्लॅस्टिक भंगार. शुक्रवारी ई-वेस्ट-थर्माकॉल रबर. शनिवारी काचेच्या वस्तू, रविवारी कागदी पुठ्ठा अशा प्रकारे कचरा संकलित केला जाणार आहे. या आदेशामुळे गृहनिर्माण संस्था, चाळीं वगैरे भागातील नागरीकांना कचऱ्यांचे वर्गीकरण करावे लागणार आहे. असे केल्यास प्रत्येक ठिकाणी छोटे डंम्पिंग ग्राऊंड तयार होण्याची भिती उपनेते विजय साळवी यांनी व्यक्त केली आहे.

विशेष म्हणजे महापालिकेने कचरा संकलनासाठी सुमित एन्क्लोप्लास या ठेकेदाराला कचरा उचलण्यासाठीचा दहा वर्षाचा ठेका दिला आहे. त्यासाठी ठेकेदाराला ८५ कोटी रुपये दरवर्षी दिले जाणार आहे. दहा वर्षांचे ८.५ अब्ज एवढी रक्कम होणार आहे. ठेकेदाराचे काम कमी करण्याचा यामागे उद्देश तर नाही ना? असा सवाल विचारला जात आहे. यापूर्वी ओला व सुका कचरा वेगळा देण्याबाबतचे आदेश होते त्याप्रमाणे दिला जात होता. आता सुका कचरा आठवडाभर साठवून आठवड्याचे वारानुसार द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ठेकेदाराचे अर्धे काम गृहनिर्माण संस्थांना करावे लागणार आहे.

या तुघलकी आदेशाप्रमाणे पुढील काळात सोसायट्यांनी आपला कचरा सोसायटीतच जाळून विल्हेवाट लावावी असेही आदेश ठेकेदाराला सहकार्य करण्यासाठी निघू शकतात अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे. एकी कडे कचरा उचलण्यासाठी महापालिकेला विशेष ‘कर’ ही द्यायचा आणि ठेकेदाराला त्रास नको म्हणून कचरा आठवडाभर साचवून ठेवायचा हे महापालिकेचे अन्यायी धोरण खपऊन घेतले जाणार नाही. हा तुघलकी आदेश महापालिकेने त्वरीत रद्द न केल्यास शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा उपनेते विजय साळवी यांनी दिला आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech