मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असून आता या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यभरातून मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाला आहे आणि उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहे. दरम्यान, जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली असून उद्यापासून पाणी पिणं बंद करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे उपोषणाची तीव्रता वाढेल आणि सरकारवर अधिक दबाव निर्माण होईल, असे संकेत मिळत आहेत.
पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, गेल्या ७० वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहे, मात्र आजवर ते दिलं गेलेलं नाही. गरीब आणि सर्वसामान्य मराठा मोठ्या कष्टाने मुंबईत दाखल झाले असून इतर समाजातील लोकसुद्धा त्यांच्या सेवेसाठी पुढे सरसावले आहेत. मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना त्यांनी आवाहन केलं की, गाड्या सुरक्षित ठिकाणी पार्क करून रेल्वेने आझाद मैदानात पोहोचा, तुमच्या गाड्या सुरक्षित राहतील.
आंदोलनादरम्यान रेनकोट वाटपाच्या नावाखाली पैसे गोळे करू नका. कोणीही पैशांची उधळपट्टी करू नये, कुणालाही एक रुपयाही देऊ नये, अशा शब्दांत त्यांनी समाजाला बजावलं. अन्नछत्राच्या माध्यमातून जेवणाची सोय करण्यात आली आहे, त्यामुळे कोणीही पैसे मागू नयेत, अन्यथा मी थेट माध्यमांमधून नावं घेईल, असा इशाराही त्यांनी दिला. “गरिबांचं रक्त पिऊ नका, महाराष्ट्राच्या मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाहीत,” असे ठणकावत त्यांनी भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करणाऱ्यांवर थेट टीका केली.
जरांगे पाटील पुढे म्हणाले की, काल आणि आज मी पाणी प्यायलो. उद्यापासून मी पाणी घेणार नाही. पाणी बंद करणार आहे. सरकार ऐकत नाही. उपोषण कडक करणार आहे. मराठा तरुणांनी मान खाली घालावी लागेल असं पाऊल उचलायचं नाही. सर्वांनी शांत राहायचं. यांनी कितीही अन्याय अत्याचार करू द्या. आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. मात्र आंदोलनादरम्यान कोणत्याही प्रकारची दगडफेक किंवा हिंसाचार होऊ नये, समाजाने शांत राहावे, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. “अन्याय होत असेल तरी तुम्ही शांत राहा. मी आरक्षण मिळवून देणार, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा आता अधिक निर्णायक टप्प्याकडे वळणार असल्याचे चित्र आहे. उद्यापासून ते पाणी पिणंही बंद करणार असल्याने आंदोलनाला अधिक तीव्र वळण मिळणार आहे आणि राज्य सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.