bank of maharashtra

दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच ‘विकसित भारता’ ची स्वप्नपूर्ती – राज्यपाल

0

मुंबई : भारताला २०४७ पर्यंत विकसित देश करावयाचे आहे. दिव्यांग बांधवांच्या प्रगतीनेच विकसित भारताची स्वप्नपूर्ती होईल, असा आशावाद राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धा २०२५ च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात व्यक्त केला. कार्यक्रमास यावेळी दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, स्पेशल ऑलिम्पिक भारताच्या अध्यक्ष डॉ. मल्लिका नड्डा, स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र शाखेच्या अध्यक्ष डॉ. मेधा सोमैया, महाराष्ट्र स्पेशल ऑलिम्पिक भारतचे महासचिव डॉ. भगवान तलवारे, क्रीडापटू करण नाईक, मूर्तुजा वर्दावाला आदी उपस्थित होते.

राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन म्हणाले, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बौद्धिकदृष्ट्या दिव्यांगांसाठी खेळ हा त्यांच्या पुनर्वसनाचा व सर्वांगीण विकासाची केंद्रे असावीत. मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ४० पेक्षा अधिक इव्हेंट्स घेण्यात आले आहे. ही बाब त्यांच्या एकाग्रतेचे, समर्पणाचे व सेवाभावाचे प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांत दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारने अनेक सुधारणा केल्या आहेत. २०१६ मध्ये लागू करण्यात आलेल्या “द राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसअ‍ॅबिलिटीज अ‍ॅक्ट” अंतर्गत, दिव्यांगतेचे प्रकार वाढविण्यात आले आहेत. तसेच केंद्रीय सेवांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षण तीन वरून चार टक्के करण्यात आले असून शिक्षणात ते पाच टक्केपर्यंत वाढविण्यात आले आहे, असेही राज्यपाल राधाकृष्णन यांनी सांगितले.

राज्यात ‘दिव्यांग कल्याण विभाग’ स्वतंत्रपणे स्थापन केला आहे. या विभागांतर्गत बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग मुलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याबद्दल राज्य शासनाचे अभिनंदन करीत आहे. बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींच्या समस्या इतर दिव्यांग व्यक्तींपेक्षा वेगळ्या व अधिक संवेदनशील असतात. बौद्धिक दृष्ट्या दिव्यांग असलेल्यांना समाजाकडून स्वीकाराची, प्रोत्साहनाची आणि संधीची अपेक्षा आहे. दिव्यांगांसाठी संस्था, शाळा, स्थानिक स्वराज्य संस्था सर्वांनी मिळून उपचार किंवा शिक्षणापुरती मर्यादित न राहता, त्यांचे संपूर्ण जीवन सुसंवादी बनविणारी प्रणाली विकसित करावी.

शासन दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे, पण समाज म्हणून आपली भूमिका अधिक व्यापक असली पाहिजे. असेही प्रतिपादनही राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी केले. भारताची कामगिरी स्पेशल ऑलिम्पिकमध्ये सातत्याने सुधारत आहे.२०२३ मध्ये बर्लिनमध्ये झालेल्या स्पेशल ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी खेळांमध्ये आपल्या खेळाडूंनी २०० हून अधिक पदके जिंकून भारताचे नाव उज्वल केले असल्याचे गौरवद्गारही राज्यपालांनी यावेळी काढले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech