बीड : सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये बीडच्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती. फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण सातारा जिल्हा हादरला आहे. डॉक्टर महिलेच्या बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कवडगाव बुद्रुक गावात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई-वडील भाऊ यांच्यासह नातेवाईकांनी मोठा हंबरडा फोडला. गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात होती. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी नातेवाईकांची मागणी आहे. यातील आरोपी कोणीही असो, त्याला सोडू नका, असं नातेवाईकांच म्हणणं आहे.
साताऱ्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहत आपल्या आत्महत्येच कारण स्पष्ट केलं होत. यानंतर कालपासून सुरु झालेल्या तपासणीसंदर्भात अनेक नवीन नवीन मुद्दे समोर आले आहेत. ज्यामुळे या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे. डॉ. संपदा मुंडे असं त्या महिला डॉक्टरच नाव असून काही महिन्यांपासून त्या पोलीस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादानंतर त्यांच्यावर चौकशी सुरू होती. ”माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन” अशी त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती. अखेर डॉ. संपदा मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचललं.
