स्फोटात ९ जणांचा मृत्यू वीसहून अधिक जखमी, पंतप्रधान मोदींनी दिला कठोर कारवाईचा इशारा
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील लाल किला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या भयंकर स्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. गृह मंत्रालयाने या घटनेच्या तपासाची जबाबदारी राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवली आहे. हा स्फोट सोमवार संध्याकाळी सुमारे ६.५० वाजता लाल किला मेट्रो स्थानकाजवळ पार्क करण्यात आलेल्या ह्युंडाई i20 कारमध्ये झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की परिसरातील इतर वाहनांनाही आग लागली. या घटनेनंतर पोलिस आणि आपत्कालीन सेवा तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. दिल्ली पोलिसांनी हा स्फोट दहशतवादी हल्ला असल्याची पुष्टी केली आहे. प्राथमिक तपासात उघड झाले आहे की कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. स्फोटात वापरण्यात आलेल्या वाहनाचा मालक तारिक उर्फ आमिर हा जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील संबूरा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
संशयित इसमाची ओळखसीसीटीव्ही फुटेजमध्ये काळा मास्क घातलेला एक व्यक्ती कार चालवताना दिसतो. त्याची ओळख मोहम्मद उमर नबी (रहिवासी – पुलवामा) अशी पटली आहे. प्राथमिक तपासानुसार त्याने स्फोटाच्या वेळी स्वतःलाही उडवून घेतले. त्याची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी त्याच्या पालकांना डीएनए चाचणीसाठी बोलावले आहे. गृह मंत्रालयाने तपासाची सूत्रे एनआयएकडे सोपवली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यांनी दोषींना शोधून काढून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत “देश अशा कृत्यांना कधीच माफ करणार नाही. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल आणि तपास यंत्रणा प्रकरणाच्या मुळाशी जाईल,” असे म्हटले आहे.
तपासात उघड झाले आहे की या हल्ल्याचा संबंध तथाकथित ‘आतंकी डॉक्टर नेटवर्क’शी आहे. या प्रकरणात उमरचा मित्र डॉ. सज्जाद तसेच हरियाणातील फरीदाबाद येथे डॉ. शाहीन शाहिद या महिलेची अटक झाली आहे. शाहीन ही भारतातील जैश-ए-मोहम्मदच्या महिला शाखा जमात-उल-मोमीनातची प्रमुख असल्याचा संशय आहे. याशिवाय सहारनपूरहून अनंतनागचा डॉक्टर आदिल अहमद आणि २,९०० किलो स्फोटकांसह पकडलेला मुजम्मिल शकील या दोघांचेही नाव तपासात समोर आले आहे. तपास यंत्रणांनी या हल्ल्यामागील सात संशयितांच्या नेटवर्कचा मागोवा घेतला आहे.
स्फोटात वापरलेली i20 कार अनेक वेळा विक्री-खरेदीतून गेल्याचे आणि फरीदाबाद–दिल्ली–पुलवामा या मार्गावर वापरली गेल्याचे उघड झाले आहे. सुरक्षा एजन्सीने तिच्या संपूर्ण रूट ट्रेलचा तपास पूर्ण केला आहे. कारने स्फोटाच्या दिवशी सकाळपासून अनेक ठिकाणी फेरफटका मारला, दुपारी सुनहरी मशिदीजवळ पार्क करण्यात आली आणि संध्याकाळी ती लाल किला मेट्रो स्थानकाजवळ पोहोचली, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनेनंतर दिल्लीसह देशभरातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. एटीएस, एनआयए आणि जम्मू-काश्मीर पोलिस संयुक्तरीत्या तपास करत आहेत.
