जनसुरक्षा विधेयकावर मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई : विधानसभेत गुरुवारी विशेष जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर झाले. राज्यात प्रत्येकाला घटनात्मक चौकटीत राहुन आंदोलन करण्याचा अधिकार अबाधित आहे. फक्त नक्षलवादी संघटनांवर प्रतिबंध लावणारे हे विधेयक असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शुक्रवारी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत हे विधेयक मांडले. या विधेयकाबद्दल विरोधकांकडून काही शंका उपस्थित करण्यात आल्या. पण त्याला फारसा विरोध केला नाही. माकपचे आमदार विनोद निकोले यांनी या विधेयकाला विरोध दर्शवला. यानंतर आवाजी मतदानाने हे विधेयक मंजुर झाले.
यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, नक्षलवादी संघटनांनी शहरी भागात काम सुरु केलेले आहे. ते अर्बन फ्रंट तयार करत आहेत. त्यांचा मूळ हेतू भारताच्या संविधानाला नाकारणे आहे. इतर राज्यांमध्ये प्रतिबंधीत असलेल्या ६ संघटना महाराष्ट्रात ऑपरेट होत आहेत. राज्यात एकूण ६४ संघटना काम करत आहेत. आम्हाला त्यांच्यावर कारवाई करता येत नव्हती. केंद्राने नक्षलग्रस्त राज्यांना असे विधेयक मंजूर करण्यास सांगितले होते. हे विधेयक कोणत्याही राजकीय भावनेने प्रेरित नाही असेही फडणवीस यांनी सांगितले. हे विधेयक मंजूर करताना लोकशाही पद्धत स्वीकारली. एकूण २६ जणांची संयुक्त समिती होती. ज्या सूचना आल्या त्या घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले.