मुंबई : मराठा आरक्षणावर सकारात्मक भूमिका पण समाजासमाजात भांडण लावू नका, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावर दिली. ते म्हणाले की आंदोलकांनी आज सकाळी शहरात प्रवेश केला असून काही ठिकाणी रास्ता रोकोच्या घटना घडल्या होत्या. मात्र पोलिसांनी वेळेवर समजूत काढल्याने आंदोलक बाजूला झाले आणि जरांगे पाटील यांनी ही स्वतः शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या कोणत्याही आंदोलनाला शासनाची सहकार्याची भूमिका असते, त्यामुळे प्रशासन त्याला सहकार्य करत आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
फडणवीस म्हणाले की, उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या चौकटीत राहून शासन आणि प्रशासन आवश्यक ती पावले उचलतील. आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी मिळाली होती, मात्र जरांगे पाटील यांनी आणखी परवानगी मागितली आहे. या बाबत कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल. मोठ्या प्रमाणात लोक जमल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून अतिउत्साही लोकांच्या कृतीमुळे आंदोलनाला गालबोट लागू शकते, याची काळजी घेणे आवश्यक आहे. मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः आंदोलनकर्त्यांना लोकशाही विरोधी व आडमुठ्या पद्धतीने वागू नये असे आवाहन केले असल्याचेही फडणवीसांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीत दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत, हा सरकारचा ठाम प्रयत्न आहे. मागील दहा वर्षांत आमच्या सरकारच्या काळातच मराठा समाजाला न्याय मिळाला असून शिक्षण, रोजगार आणि उद्योगासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाबाबत आमची भूमिका सकारात्मक आहे आणि संविधानिक चौकटीत राहून त्यावर मार्ग काढला जाईल. यासाठी सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली असून या समितीला शासनाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. समितीचा निर्णय हा मंत्रिमंडळाचा निर्णय मानला जाईल.
यावेळी फडणवीसांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, काही लोक जाणीवपूर्वक ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न करत आहेत. सकाळपासून काही लोकांची विधाने ऐकली, त्यातून त्यांचा हेतू स्पष्ट दिसतो. समाजासमाजात दरी निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत आहे, मात्र अशा प्रयत्नांमुळे उलट त्यांचेच तोंड भाजेल. ठाकरे-पवार यांच्या आघाडीतून असे डावपेच रचले जात असून त्यांचा उद्देश समाजात गोंधळ निर्माण करण्याचा आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.
त्यांनी स्पष्ट केले की, शासनाची भूमिका सोयीस्कर नसून ठाम आहे. जे कायदेशीर आहे ते होईलच, पण विरोधकांनी ठाम भूमिका न घेता फक्त समाजात मतभेद निर्माण करून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. आमचे सरकार मात्र कोणत्याही समाजाला नाराज न करता सर्वांच्या इच्छा आणि मागण्या समजून घेत आहे. चर्चेतून मार्ग निघेल आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच सर्व प्रश्न सोडवले जातील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.
शेवटी त्यांनी आंदोलन शांततेत पार पाडावे, कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि मागण्यांवर समिती विचार करत असून त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगत शासनाच्या सहकार्याच्या भूमिकेची पुनरुच्चार केला.