bank of maharashtra

मराठा आरक्षण : अभ्यासपूर्ण तोडगा निघाला- मुख्यमंत्री

0

नागपुर : मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मंत्रीमंडळ उपसमितीने काढलेला तोडगा हा सखोल अभ्यासातून समोर आला आहे. न्यायालयात टिकेल व मराठा समाजाला फायदा करून देईल असा तोडगा आम्ही काढला आहे. विशेष म्हणजे यामुळे ओबीसींच्या आरक्षणावर कुठलीही गदा येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात केले.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठी आमची सुरुवातीपासूनची तयारी होती. मात्र मनोज जरांगे पाटील यांची सरसकटची मागणी पूर्ण करण्यात कायदेशीर अडचणी होत्या. आरक्षण हे समुहाला नव्हे तर व्यक्तीला मिळत असते. त्या व्यक्तीने त्यावर दावा करायचा असतो. जरांगे यांच्या शिष्टमंडळाने ही बाब समजून घेतली व कोंडी दूर झाल्याचे त्यांनी सांगितले.

मंत्रीमंडळ उपसमितीने सातत्याने बसून व एकेका गोष्टीचा अभ्यास करून हा मार्ग काढला आहे. हा तोडगा निघाल्याने मराठवाड्यात राहणाऱ्या मराठा समाजाच्या फायदा होणार आहे. ज्या लोकांचा कधीही एकदा तरी कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल त्यांना तसे प्रमाणपत्र देता येईल. हैदराबाद गॅझेटिअरमुळे अशा नोंदी शोधणे सोपे होणार आहे. त्यातून फॅमिली ट्री स्थापित करून आरक्षण देता येणार आहे. ज्यांच्याबाबत असा पुरावा मिळेल त्यांना आरक्षण मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ज्यांचा खरा दावा आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना काहीच करता येत नव्हते अशा मराठा समाजातील लोकांना याचा फायदा होणार आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.

ओबीसी समाजाने आंदोलन मागे घ्यावे
मराठा समाजातील सरसकट सर्व आरक्षण घेतील व इतर समाजातील लोकदेखील त्यात घुसतील अशी ओबीसी समाजात भिती होती. मात्र आता असे काहीही होणार नाही. आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठलीही गदा आलेली नाही. त्यांनी सर्व आंदोलने परत घेतली पाहिजे. आमचे सरकार आहे तोपर्यंत मराठा विरुद्ध ओबीसी या दोन समाजांना तेढ निर्माण करण्याचे काम होणार नाही. महाराष्ट्राची सामाजिक वीण घट्ट ठेवणे महत्त्वाचे आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईकरांची दिलगिरी
मराठा समाजाच्या आंदोलनादरम्यान मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्यासंदर्भात मुंबईकरांची मी दिलगिरी व्यक्त करतो. आंदोलनामुळे पोलीस व बीएमसी प्रशासनावर ताण पडला होता. तसेच उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती व सरकारला सूचना केल्या होत्या. त्यांचे तंतोतंत पालन करण्यावर आमचा भर असेल. मंत्रीमंडळ उपसमितीने खूप चांगले काम केले आहे. ही समिती पुढेदेखील समाजासाठी काम करेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

राजकारणात सर्वच पाचवावे लागते
माझ्यावर टीका झाली तेव्हा मी विचलीत झालो नाही. मराठा समाजाला न्याय देणे हेच माझे ध्येय होते. तो न्याय देत असताना दोन समाजात तेढ व अन्यायाची भावना निर्माण होणार नाही हे माझ्या डोक्यात होते. मला शिवीगाळ केली तरी मी सर्वच समाजांसाठी काम करत राहेन व ते माझे कर्तव्यच आहे. काम करत असताना कधी शिव्या मिळतात तर कधी फुलांचे हारदेखील मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech