मुंबईकरांना झालेल्या त्रासबद्दल दिलगिरी व्यक्त – मंत्रिमंडळ उपसमितीचे अभिनंदन
नागपूर : मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि समितीमधील मंत्र्यांचं मला पहिल्यांदा अभिनंदन करायचं आहे. त्यांनी सातत्याने बैठका घेऊन चर्चा करुन मार्ग काढला आहे. मात्र आज अखेर आनंद आहे, मराठा समाजाच्या आंदोलनावर समितीने चांगला तोडगा काढला. मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं आहे. आम्ही एक संविधानिक तोडगा काढू शकलो आहोत. हे आरक्षण कोर्टातही टिकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. तसेच हैदराबाद गॅझेट काढण्याबद्दल आमची भूमिका होती. आमची सुरुवातीपासून तयार होती. मनोज जरांगेंची सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, त्याबद्दल कायदेशीर अडचणी होती, ही बाबही फडणवीस यांनी सांगितली. दरम्यान मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. त्या निमित्ताने मी दिलगिरी व्यक्त करतो, असेही ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले की, हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय पाहता जरांगेंच्या मागणीनुसार सरसकट करणं शक्य नव्हतं. या संदर्भात ही वस्तूस्थिती त्यांच्याही लक्षात आणून दिली. जरांगेंच्या टीमच्याही लक्षात आणून दिली. आपला कायदा आणि संविधानानुसार आरक्षण हे समुहाला नसतं तर व्यक्तीला असतं. हे जरांगेंना समजावून सांगितलं. ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही. त्यांनीही ते स्वीकारलं. त्यावर जर कायद्यात बसत नसेल तर सरसकट करू नका. मग त्यातून एक मध्यम मार्ग काढला. त्यातून पुन्हा चर्चा सुरू केली. त्याचा जीआर तयार केला. त्यातही बदल केले, आता जीआरही काढला आहे. त्यासोबतच इतर मागण्या होत्या. त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केल्या आहेत.
हा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यासाठी महत्त्वाचा होता. कारण मराठवाड्यात रेकॉर्ड नाहीत. मात्र आता मध्यम मार्ग निघाल्यामुळे मराठवाड्यात राहणाऱ्या आमच्या मराठा समाजाच्या लोकांना कधीकाळी रक्तनात्यातील लोकांचा कुणबी म्हणून उल्लेख असेल तर त्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार आहे. हैदराबाद गॅझेटियरमुळे ते सोपं होणार आहे. फॅमिली ट्री इस्टॅब्लिश करुन आरक्षण दिलं जाणार आहे. ज्यांना अशाप्रकारचे पुरावे मिळेल ते सगळ्यांना आरक्षण मिळेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
ओबीसी समाजाला भीती होती की, सरसकट सगळे अशाप्रकारे आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही ते देखील आरक्षण घेतील. तसेच इतरही समाजाचे ज्यांना आरक्षण नाही ते देखील आरक्षण घेतील. तशाप्रकारे आता होणार नाही. ज्यांचा खरा क्लेम आहे, पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता, अशा मराठा समाजाच्या नागरिकांना आता आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय झाला.