मुंबई : “शाळा बंद करण्याचा दम भरण्याआधी मदरसे बंद करून दाखवा,” असे राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटले आहे. आज ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मीरारोड येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीचा मुद्दा उपस्थित करत, “दुकाने काय, शाळाही बंद करू,” असा इशारा दिला होता. यावर बोलताना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पुढे ते म्हणाले की, “मदरशांमध्ये दहशतवादी तयार होतात, बुलढाण्यात येमेनचे नागरिक सापडले होते. अनेक ठिकाणी जिलेटिन कांड्या, तलवारी सापडतात. मग आमच्या शाळांवर का बोट ठेवता?” राणे यांनी त्रिभाषा सूत्राच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “हिंदी सक्तीचा निर्णय कोणी घेतला, जीआर कोणी मागे घेतला हे समजून घ्या. ज्याच्या बरोबर तुम्ही हातात हात घालता, तोच खरा ‘हिंदी सक्तीचा शकुनीमामा’ आहे,” अशी टीका करत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर आरोप केला.
त्याचबरोबर ‘सामना’मधील राज ठाकरे यांच्या सभेच्या कव्हरेजवरूनही राणेंनी टोला लगावत विचारले, “बंधू प्रेम असेल तर आज ‘सामना’मध्ये सभेची बातमी का नाही?” नया नगर परिसरातील भाषाविषयक वादांवर बोलताना राणे म्हणाले, “मराठीत न बोलणाऱ्यांना मराठी शिकवा, गरीब हिंदू समाजाला का मारता?” या विधानावर मनसेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नितेश राणेंना प्रत्युत्तर देत विचारले, “संजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू नव्हते का? आधी याचं उत्तर द्या, मग आरोप करा.”