दर्जेदार विकासकामांनी नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार-मुख्यमंत्री
नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आणि नाशिक महानगरपालिका तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने होणाऱ्या नाशिक शहरातील पाच हजार ६५७ कोटी ८९ लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे दर्जेदार आणि पारदर्शक पद्धतीने करून नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करणार, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी ते म्हणाले की प्रयागपेक्षा तीन पट जास्त गर्दी नाशिक मध्ये होणार असल्याने तसे नियोजन केले जात आहे
ठक्कर मैदान येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री माणिकाराव कोकाटे, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार शोभा बच्छाव, राज्याचे मुख्य सचिव राजेशकुमार व नगर विकास विभागाचे अपर सचिव गोविंदराज (दूरदृष्यप्रणालीद्वारे), जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.प्रविण गेडाम, आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते.
मागील कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, यावेळी कुंभमेळ्यात गतवेळेपेक्षा पाचपट अधिक भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांची व्यवस्था, सुरक्षा, पर्वस्नान व अमृतस्नानाचे नियोजन आणि या सोहळ्याचा मुळ गाभा असलेल्या आध्यात्मिकतेचा अनुभव भाविकांना देण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामतून २० हजार कोटीपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील. शासनाच्या सर्व विभागांनी समन्वयाने कामे केल्याने मोठ्या प्रमाणात कामाला सुरूवात होत आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या नागरिकांनीही यासाठी सहकार्य केले आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कुंभमेळ्यासाठी रस्ते, महामार्ग दुरूस्ती, पिण्याच्या पाण्याची योजना, गोदावरीचे पावित्र्य राखणे, चांगल्या घाटांची निर्मिती, जुन्या मंदिरांचे पुनरुज्जीवन, विकासकामे करतांना गोदाघाटाचे पुरातन रुप कायम ठेवणे यावर भर देण्यात येत आहे. नाशिक हे महत्वाचे तीर्थक्षेत्र असल्याने इथे होणारी विकासकामे पुढील २५ वर्ष टिकली पाहिजे आणि नाशिक पर्यटनक्षेत्र म्हणून विकसीत व्हावे असा प्रयत्न या माध्यमातून होत आहे. या विकासकामांच्या माध्यमातून नाशिकचे रुप बदलेल आणि शहराच्या सर्वांगिण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यात भाविकांचे व्यवस्थापन व्हावे यासाठी बाह्य वर्तुळाकार मार्ग तयार होत असून भविष्यातल्या नाशिकसाठी याचा फायदा होणार आहे. नाशिक विमानतळावर नवीन टर्मिनल इमारत, रेल्वे सुविधा, बस स्थानकाची सुविधा, स्मार्ट सीसीटीव्ही यंत्रणेच्या माध्यमातून आधुनिक नाशिक शहर विकसीत करण्यावर भर देण्यात येत आहे. एकूण बाराशे एकर जागा अधिग्रहीत करून त्यावर कुंभाचे आयोजन करण्यात येत आहे. भविष्यातही कुंभच्या आयोजनात कुठलीही अडचण राहणार नाही असा प्रयत्न आहे. कुंभमेळ्याची ही सर्व कामे पारदर्शी पद्धतीने होतील अशी ग्वाही .फडणवीस यांनी दिली. विकासकामे करतांना नागरिकांचे नुकसान होऊ देणार नाही, तथापि सामाजिक कार्य समजून नागरिकांनीही विकासकामांना सहकार्य करावे. साधूसंतांनी शासनाला कुंभमेळा आयोजनासाठी मार्गदर्शन करावे, त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
सिंहस्थ कुंभमेळ्यात ७५ वर्षानंतर त्रिखंड योग जुळून आल्याने हे कुंभपर्व विशेष असून ते २८ महिने चालणार आहे. ४० ते ४२ पर्वस्नान आणि महत्वाचे अमृतस्नान या कुंभात होणार आहे. प्रयागराज कुंभमेळ्यात देशातील सांस्कृतिक पुर्नजागरणाच्या मोहिमेची प्रचिती आली. याच कुंभच्या परंपरेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा कुंभमेळा महत्वाचा मानला जातो. प्रयागराज येथे १५ हजार हेक्टर जागा असून नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे ५०० एकर जागा आहे. अत्यंत कमी जागा असूनही २०१५ मध्ये कुंभमेळ्याचे चांगले आयोजन करण्यात आले. यावेळीदेखील असे आयोजन व्हावे यादृष्टीने शासन आणि प्रशासनाने त्यासाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलेल आणि शहराचा नियोजनबद्ध विकास होईल. त्यादृष्टीने प्रशासनाने चांगली तयारी केली आहे. कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी राज्य शासनाने फार पूर्वीपासून तयारी सुरू केली आहे. नाशिकची जगाच्या नकाशावर ओळख निर्माण करणारा हा सोहळा असेल. कुंभपर्व ही नाशिकला सुंदर आणि आधुनिक शहर करण्याची ही संधी आहे.
