बिजापूर : छत्तीसगड्या बिजापूर जिल्ह्यातील उसूर पोलीस ठाणे क्षेत्रात शुक्रवारी रात्री नक्षलवाद्यांनी २ निष्पाप ग्रामस्थांची निर्घृण हत्या केली. स्थानिक नेलाकांकेर येथील रवि कट्टम आणि तिरुपती सोढी यांना नक्षलवाद्यांना धारदार शस्त्राने हल्ला करून ठार मारले.घटनेची माहिती मिळताच उसूर पोलीस दल घटनास्थळी रवाना झाले आणि संपूर्ण परिसरात तीव्र शोधमोहीम सुरू करण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची पुष्टी केली जात आहे तसेच आसपासच्या गावांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री विजय शर्मा हे शुक्रवारीच बीजापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या परतीनंतर लगेचच माओवाद्यांनी ही भयंकर घटना घडवून आणली.एका बाजूला जिथे अनेक माओवादी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात सामील होत आहेत, तिथे दुसऱ्या बाजूला संघटना ग्रामस्थांच्या हत्या करून आपली उपस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्षी आतापर्यंत बस्तर विभागात माओवाद्यांनी ३७ पेक्षा अधिक ग्रामस्थांची हत्या केली आहे. या ताज्या घटनेनंतर परिसरात भय आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर सुरक्षा दलांनी शोधमोहीम आणि माओवादीविरोधी कारवाया अधिक तीव्र केल्या आहेत.
