bank of maharashtra

माजी मंत्री रविंद्र चव्हाण भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

0

किरेन रिजिजूंनी मुंबईत केली अधिकृत घोषणा

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांची महाराष्ट्राचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून आज, मंगळवारी निवड करण्यात आली आहे. भाजपाचे नेते तथा केंद्रीय संसदीय कार्य व अल्पसंख्याक विकासमंत्री किरेन रिजिजू यांनी ही अधिकृत घोषणा केली आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून चव्हाण हे सूत्रे स्वीकारली आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आषिश शेलार, विनोद तावडे यासह भाजपाचे सर्व आमदार, पदाधिकारी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच रवींद्र चव्हाण यांच्यावर भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, आता त्यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे रविंद्र चव्हाण हे भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत.

मुंबईतील वरळी डोममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. अंत्यंत भव्यदिव्य अशा या कार्यक्रमाला आत्तापर्यंतची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती. सर्व आसन व्यवस्था फुल्ल झाल्याने भाजप कार्यकर्त्यांना उभे राहून कार्यक्रम पाहावा लागला. या कार्यक्रमात रविंद्र चव्हाण यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेत फक्त रविंद्र चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. दुसरे कोणीही अर्ज दाखल न केल्यामुळे रविंद्र चव्हाण यांची भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर रविंद्र चव्हाण यांची निवड महत्वाची मानली जात आहे. रविंद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून चारवेळा निवडून आलेले आहेत. तसेच रविंद्र चव्हाण हे प्रभावी नेते असून त्यांचा तळागाळातील भाजपा कार्यकर्त्यांबरोबर दांडगा जनसंपर्क आहे.

रविंद्र चव्हाण भाजपच्या युवा मोर्चातून राजकारणात आले असून, कल्याण-डोंबिवली महापालिकेत नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ४ वेळा आमदार, भाजप प्रदेश सरचिटणीस, मंत्रीपद अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. डोंबिवली मतदारसंघातून ते सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून कारकिर्दीस सुरुवात करून भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंतचा त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहेरविंद्र चव्हाण यांच्या निवडीमुळे भाजपच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक कामकाजाला नवे नेतृत्व मिळाले असून, आगामी निवडणुकांसाठी पक्षात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech