bank of maharashtra

कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी पुढील वर्षी येणार भारत दौऱ्यावर

0

नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी पुढील वर्षी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या जी-२० शिखर परिषदेनंतर द्विपक्षीय चर्चेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्नी यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले, आणि त्यांनी ते स्वीकारले. कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पंतप्रधान कार्नी यांनी २०२६ च्या सुरुवातीला भारत भेटीचे मोदींचे आमंत्रण स्वीकारले आहे.” निवेदनात सांगितले की चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रांमध्ये संबंध अधिक मजबूत करण्याबरोबरच संरक्षण आणि अवकाश क्षेत्रातील सखोल सहकार्याच्या शक्यतांवर काम करण्यास सहमती दर्शवली.

निवेदनात पुढे म्हटले आहे, “वस्तू, सेवा, गुंतवणूक, शेती, डिजिटल व्यापार आणि शाश्वत विकास यांचा समावेश असलेल्या महत्त्वाकांक्षी सर्वंकष आर्थिक भागीदारी करारासाठी (सीईपीए ) औपचारिक चर्चा सुरू करण्यास दोन्ही नेते तयार झाले आहेत.” तसेच मोदी आणि कार्नी यांनी मंत्री, व्यापारी समुदाय आणि इतर वरिष्ठ स्तरावरील प्रतिनिधींच्या नियमित परस्पर भेटींचे महत्त्व मान्य केले. कार्नी यांनी दोन्ही देशांमध्ये कायदा अंमलबजावणी संदर्भातील चर्चेत होत असलेल्या प्रगतीचे स्वागत केले.

कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी २०२३ मध्ये हरदीप सिंग निज्जर यांच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केल्यानंतर भारत-कॅनडा संबंध अत्यंत बिघडले होते. भारताने ट्रूडोंचे आरोप “निराधार” सांगून फेटाळून लावले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांत दोन्ही देशांनी संबंध पुन्हा सामान्य करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech