मुंबई : मुंबई महानगरातील सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासूनचे अडथळे दूर करीत मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचा आमचा निर्धार आहे. नगरविकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होऊन झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल होईल,’ असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी(दि.१७)विधानसभेत व्यक्त केला.
विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, , ‘मुंबईला जगाशी जोडण्याचे काम आम्ही करत आहोत. मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचे काम खऱ्या अर्थाने आम्ही करत आहोत.मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्याचे काम सरकार करीत आहे.यामध्ये मोतीलाल, जीटीपीनगर येथे समूह विकास प्रकल्पासाठी विकासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे ४,९०० रहिवाशांना घरे मिळणार आहेत. कामाठीपुरा अभ्युदयनगर, आदर्शनगर वरळी आणि वांद्रे रेक्लमेशन, वरळी नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळ, रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टीचे पुनर्वसन अशी कामे करण्यात येणार आहेत.’
कामाठीपुरा, अभ्युदयनगर येथील समूह विकासासाठी निविदा प्रक्रिया सुरू असून, सप्टेंबर २०२५पर्यंत ती पूर्ण होईल. ११ हजार ४११ भाडेकरूंना पुनर्विकासाचा लाभ होणार आहे. आदर्शनगर, वरळी आणि वांद्रे रिक्लेमेशन येथे क्लस्टरचा लाभ २,०१० रहिवाशांना होणार आहे. त्याचीही निविदा प्रक्रिया सुरू आहे. वरळीमध्ये ५५६ सदनिकांचे वाटप १५ ऑगस्टपर्यंत करणार आहोत. एकूण सदनिकांपैकी २५ टक्के सदनिकांचे वाटप डिसेंबर २०२५पर्यंत करण्याचे नियोजन असल्याचे शिंदेंनी सांगितले.