रत्नागिरी : अपघातांची संख्या आणखी कमी करण्यासाठी सर्वांनी रस्ता सुरक्षा, वेग मर्यादा पालन, मद्यपानविरहित वाहतूक, स्वयंशिस्त याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. त्याचबरोबर ब्रेथ ॲनालायझारद्वारे तपासणी करून बंधन आणावे, अशी सूचना खासदार सुनील तटकरे यांनी केली. जिल्हा नियोजन समिती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक आज झाली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर यांनी संगणकीय सादरीकरण करून सविस्तर माहिती दिली. अपघातांमध्ये २० टक्क्यांनी घट झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. खासदार तटकरे म्हणाले, परशुराम घाटामध्ये दरडी कोसळून होणाऱ्या अपघातांबाबत विशेष लक्ष केंद्रित करावे. त्याबाबतच्या तांत्रिक उणिवा दूर कराव्यात. आवश्यक त्या ठिकाणी फलक लावून सूचना कराव्यात. मोकाट जनावरांमुळे अपघात होऊ नये, यासाठी पशुसंवर्धन अधिकारी, मुख्याधिकारी, ग्रामसेवक यांनी उपाययोजना कराव्यात. संबंधित सर्वच विभागांनी सतर्क राहून आपापली जबाबदारी पार पाडावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपूर्ण राहिलेली रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. उपप्रादेशिक परिवहन विभागाने ब्रेथ ॲनालायझरचा वापर करून मद्यपान करून वाहने चालविणाऱ्यांवर बंधने आणावीत.
गतिमान प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या अनेक योजना प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांना लाभ देता येऊ शकतो. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून निसर्गाशी निगडीत एखादा प्रस्ताव तयार करावा. कासव पर्यटन, पुरातन मंदिरांच्या ठिकाणी तीर्थक्षेत्र पर्यटन विकसित होऊ शकते. भारतरत्नांचे स्मारक तयार करण्याचा प्रस्ताव पाठवा. दापोली, मंडणगड, गुहागरमध्ये पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. तो भाग विकसित करण्यासाठी पर्यटनावर आधारित चांगला प्रस्ताव द्या. त्यासाठी भारत सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असेही ते म्हणाले. उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांच्यासह सदस्य सतीश दिवेकर, सखाराम कदम, सुरेश सावंत, नेहा जाधव, संदीप बांदकर आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.