bank of maharashtra

बंगाल विधानसभेत भाजप-तृणमूल आमदारांमध्ये धक्काबुक्की

0

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी, गुरुवारी, भाजपशासित राज्यांमध्ये बंगाली स्थलांतरित कामगारांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ मांडण्यात आलेल्या ठरावावर चर्चा सुरू असताना सभागृहात अभूतपूर्व गोंधळ आणि धक्काबुक्की झाली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठरावावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या, तेव्हा विरोधी पक्ष भाजपचे आमदार आपल्या जागांवरून उभे राहून जोरदार घोषणा देऊ लागले. सतत घोषणा देणे आणि सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली विधानसभा अध्यक्ष (स्पीकर) विमान बॅनर्जी यांनी भाजपच्या पाच आमदारांना – मुख्य सचेतक डॉ. शंकर घोष, अग्निमित्रा पॉल, मिहिर गोस्वामी, अशोक दिन्दा आणि बंकिम घोष – यांना आजच्या उर्वरित दिवशी कामकाजातून निलंबित केले. सभागृहात सुमारे दीड तास दोन्ही पक्षांतून गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू होती.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संपूर्ण भाषणात जोरदार घोषणांमुळे व्यत्यय आला. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनीही “भाजप चोर आहे” अशा घोषणा देत प्रतिसाद दिला. गोंधळाची सुरुवात दुपारी १.५० वाजता झाली, जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ठरावावर बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. तेव्हा भाजपचे मुख्य सचेतक डॉ. शंकर घोष यांनी आरोप केला की, “आमच्या सर्व वक्त्यांना स्पीकर यांनी बोलू दिलं नाही.” स्पीकर बॅनर्जी यांनी या आरोपांना फेटाळून लावले आणि वारंवार भाजप आमदारांना शांत बसण्याचे आवाहन केले. मात्र, घोषणाबाजी सुरूच राहिली. विरोधी आमदार सभागृहाच्या मध्यभागी येऊन घोषणा देत होते आणि कागद फाडून हवेत फेकत होते.

चेतावणीनंतर स्पीकर यांनी डॉ. शंकर घोष यांना सभागृहाच्या उर्वरित कामकाजातून निलंबित केले आणि त्यांना बाहेर काढण्याचे आदेश मार्शलना दिले. यावेळी भाजप आमदार आणि मार्शलमध्ये जोरदार झटापट झाली. इतर भाजप आमदारांनी डॉ. घोष यांच्याभोवती गर्दी केली, त्यातून दोन्ही बाजूंनी जोरदार धक्काबुक्की झाली आणि शेवटी घोष हे खाली पडले. अखेर मार्शल्सनी त्यांना जबरदस्तीने खेचून बाहेर काढले. गोंधळातही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपले भाषण देण्याचा प्रयत्न करत होत्या, पण घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर स्पीकर यांनी भाजपचे आणखी 4 आमदार – अग्निमित्रा पॉल, मिहिर गोस्वामी, अशोक दिन्दा आणि बंकिम घोष – यांनाही कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल निलंबित केले. स्पीकर यांनी भाजप आमदारांच्या वर्तनाचा निषेध करत म्हटले की, “ही विधानसभा आहे, क्लब रूम नाही.”

दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी भाषणात भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, “भाजपला बंगाल आणि बांग्ला भाषेची चीड आहे. ते बांग्ला विरोधी आणि देशद्रोही आहेत. भाजप म्हणजे चोर आणि डाकूंचा पक्ष आहे. गोडसेच्या विचारांचा पक्ष म्हणजे भाजप.” त्यांनी आरोप केला की, “भाजप देशभरात अत्याचार करत आहे. बंगालमध्येही लोकांवर अन्याय होत आहे. माझ्या आवाजाला लोकांपर्यंत पोहोचू न देणं, ही भाजपची कटकारस्थाने आहे. बांग्ला भाषेचा अपमान करणारा पक्ष म्हणजे भाजप. ते बंगालला गुलाम बनवू इच्छितात. मी बांग्ला भाषेचा अपमान कधीही सहन करणार नाही.” यावेळी ममतांनी “भाजप चोर”, “मोदी चोर”, “व्होट चोर, गादी छोड़” अशा घोषणा सभागृहात दिल्या.

Share.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech