पाटणा : मला अभिमान वाटतो की बिहारच्या जनतेने बदल स्वीकारला आहे. त्यांनी विकासराजला पाठिंबा दिला आणि जंगलराजला नाकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार तसेच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचेही हार्दिक अभिनंदन करतो, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी पाटणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
एकनाथ शिंदे आज, नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी समारंभाला उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, बिहारच्या जनतेने दिलेला हा लँडस्लाईड विजय म्हणजे विकासावर शिक्कामोर्तब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. तसेच नितीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवली व त्यामुळेच बिहारमध्ये आज सकारात्मक बदल दिसत आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
दरम्यान, पूर्वी येथे जे वातावरण होते, ते पूर्णपणे बदलले आहे. आता येथे गुंडाराज नाही; लोकशाही, विकास आणि जनतेचे राज्य आहे. हे शक्य झाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वामुळे. त्यामुळे दोघांचेही मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचेही खूप खूप आभार मानतो, असे शिंदे म्हणाले.
