नागपूर : वर्ष २००७ च्या खुनाच्या प्रकरणात १८ वर्षे तुरुंगात शिक्षा भोगल्यानंतर गँगस्टर अरुण गवळी बुधवारी(दि.३) नागपूर सेंट्रल जेलमधून बाहेर आला. सुप्रीम कोर्टाने अरुण गवळीला जामीन मंजूर केला आहे. मुंबईतील शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांदेकर यांच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने गवळीची जामिनासाठीची याचिका मंजूर केली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तुरुंगातील सर्व कायदेशीर औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, गवळी बुधवारी दुपारी सुमारे १२:३० वाजता तुरुंगाबाहेर आला. यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी आणि समर्थकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले.
गवळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने गवळीला खालच्या न्यायालयाने घालून दिलेल्या अटी आणि नियमांखाली जामीन मंजूर केला. गवळीने बॉम्बे उच्च न्यायालयाच्या 9 डिसेंबर 2019 च्या निर्णयाला आव्हान दिले होते, ज्यात खालच्या न्यायालयाने दिलेली जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली होती.
अरुण गवळी मुंबईतील भायखळा भागातील दगडी चाळ येथून चर्चेत आला आणि त्याने “अखिल भारतीय सेना” या राजकीय पक्षाची स्थापना केली. तो २००४ ते २००९ दरम्यान चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आला होता. ऑगस्ट २०१२ मध्ये, मुंबईच्या एका सत्र न्यायालयाने गवळीला शिवसेना नगरसेवकाच्या खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि १७ लाख रुपयांचा दंड ठोठावला होता.