नवी दिल्ली : २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला खंबीरपणे तोंड दिलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूर सैनिकांना केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली. या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्व नागरिकांनाही अमित शहा यांनी श्रद्धांजली वाहिली. एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये अमित शाह यांनी लिहिले आहे की, २००८ मध्ये आजच्याच दिवशी दहशतवाद्यांनी मुंबईवर भ्याड हल्ला करुन एक भयानक आणि अमानवी कृत्य केले होते.
मुंबई दहशतवादी हल्ल्याला खंबीरपणे तोंड दिलेल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या शूर सैनिकांना मी आदरांजली वाहतो, तसेच या भ्याड हल्ल्यात प्राण गमावलेल्या सर्वांना मी श्रद्धांजली वाहतो. दहशतवाद हा केवळ एकाच देशाला भेडसावणारा धोका नाही तर संपूर्ण मानवजातीसाठीच एक मोठा शाप आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकारचे दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेचे धोरण स्पष्ट आहे आणि संपूर्ण जग त्याचे कौतुक करत असून भारताच्या दहशतवाद विरोधी कार्यवाहीला आपला व्यापक पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.
