श्रीनगर : अमरनाथ यात्रेच्या १६व्या दिवशी १६,८८६ भाविकांनी पवित्र गुहेतील बर्फातून निर्माण झालेल्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. ३ जुलैपासून सुरू झालेल्या या पवित्र यात्रेत आतापर्यंत तीन लाखांहून अधिक भाविकांनी गुहेचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू-कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली. “ही यात्रा भक्तांसाठी एक अत्यंत समृद्ध अनुभव आहे,” असे ते म्हणाले.
यात्रेच्या सुरुवातीपासून भाविकांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. पहिल्या पाच दिवसांतील भाविकांची अधिकृत संख्या पुढीलप्रमाणे — गुरुवारी १२,३४८, शुक्रवारी १४,५१५, शनिवारी २१,१०९, रविवारी २१,५१२ आणि सोमवारी तब्बल २३,८५७ भाविकांनी दर्शन घेतले. भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेच्या संपूर्ण मार्गावर ५८१ सुरक्षा कंपन्या तैनात असून, दर ५० मीटरवर एक जवान उपस्थित आहे. सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी, आयटीबीपी आणि सीआयएसएफचे जवान मार्गावर कार्यरत आहेत.
बालटाल ते गुहा या मार्गावर दर दोन किलोमीटरवर वैद्यकीय शिबिरे उभारण्यात आली आहेत. पुरवठा सुरळीत राहावा यासाठी अनेक गोदामे सुरू करण्यात आली आहेत. तसेच, घोडा, पालखी आणि पायी जाणाऱ्यांसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्यात आले आहेत. मुंबईहून आलेले भाविक प्रसाद ठाकूर यांनी सांगितले, “नोंदणी नसलेल्या भाविकांनाही लगेच नोंदणी करता आली. आज ७०,००० ते ८०,००० भाविकांनी दर्शन घेतले. लंगर, टॉयलेट आणि निवास व्यवस्थाही उत्तम आहे.”
पहलगाम मार्ग निसर्गसौंदर्याने नटलेला, पण कठीण अमरनाथ यात्रा पहलगाम आणि बालटाल अशा दोन मार्गांनी करता येते. पहलगाम मार्ग नैसर्गिक सौंदर्याने समृद्ध असून, साधारण तीन दिवसांचा कालावधी लागतो. चंदनवारी, शेषनाग, पंचतरणी अशा टप्प्यांमधून ही यात्रा होते. मात्र, हा मार्ग काही ठिकाणी अरुंद व खडकाळ असून, डोंगराळ भागांमध्ये रेलिंग्स नसल्याने अधिक काळजी घ्यावी लागते. गणेश टॉप, पिस्सू टॉप आणि पंचतरणी भागात यंदा डॉग स्क्वॉडसह जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अधिक सुरक्षा व्यवस्था दिसून आली.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, आधार कार्ड, आरएफआयडी कार्ड, चार पासपोर्ट फोटो आणि प्रवास अर्ज सोबत बाळगावा. प्रवासापूर्वी चालण्याचा सराव व श्वसनाचे व्यायाम करणे उपयुक्त ठरेल. प्रवासात उबदार कपडे, पावसाचे रेनकोट, ट्रेकिंग स्टिक, पाण्याची बाटली आणि औषधांसह आवश्यक वैयक्तिक वस्तू सोबत ठेवाव्यात.